Mumbai : कफ परेड परिसरात सांडपाणी थेट समुद्रात; असह्य दुर्गंधीने नागरिक हैराण

मुंबई
Updated Apr 21, 2019 | 14:35 IST | The Times of India

Mumbai : गेल्या महिनाभरापासून कफ परेड परिसरात मैला मिश्रित सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जात आहे. नागरिकांना असह्य दुर्गंधीला सामोरे जावे लागत असून महापालिकेने याप्रकरणी कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.

Sewage spills in sea water in Mumbai
मुंबईत सांडपाणी मिसळतेय समुद्रात (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मुंबईत मैलामिश्रित सांडपाणी थेट समुद्रात
  • कफ परेड परिसरात नागरिकांना असह्य दुर्गंधीचा त्रास
  • मुंबई महापालिकेचे कंत्राटदाराकडे बोट; नोटीस बजावली

मुंबई : मुंबईतील कफ परेड परिसरात मैला मिश्रित सांडपाणी समुद्रात मिसळत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, त्याबाबत स्थानिक नागरिकांनी बृहन्मुंबई महापालिकेकडे तक्रारही दाखल केली आहे. मात्र, महापालिका सध्या केवळ हात झटकण्याचे काम करत असून, त्यांनी याप्रकरणी कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे. गेल्या महिनाभरापासून ही दुर्गंधी पसरली असल्यामुळे आता परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. या संदर्भात मिळालेली माहिती अशी, कफ परेड परिसरातील जी. डी. सोमानी आऊटफॉल येथून मोठ्या प्रमाणावर मैलायुक्त सांडपाणी थेट समुद्रात मिसळत आहे. समुद्रात काळे पाणी मिसळताना स्पष्ट दिसत आहे. या परिसरातील नागरिकांनी त्याचे फोटो काढून महापालिकेत याप्रकरणी तक्रारही दाखल केली आहे. गेले जवळपास महिनाभर याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप त्यावर ठोस उपाययोजना झालेली नाही.

असह्य दुर्गंधी

सध्या जॉली मेकर १ आणि ३ तसेच मेकर टॉवर एच येथील नागरिकांना याचा त्रास होत आहे. दुर्गंधीमुळे दिवसभर मळमळ होत आहे. तसेच पर्यावरणावरही त्याचा वाईट परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात जॉली मेकर ३ या इमारतीमधील १८व्या मजल्यावर राहणाऱ्या सुलक्षणा चौगले म्हणाल्या, ‘दुर्गंधी सहन करता न येण्याएवढी आहे. दिवसभरात केव्हा मैला बाहेर पडतो त्यानुसार दुर्गंध कमी जास्त होताना दिसते. खिडकीतून समुद्रातील पाण्यात दिसणारा काळ्या पाण्याचा तवंग गेल्या काही दिवसांपासून तसाच दिसत आहे.’

नगरसेवक, पालिका अधिकाऱ्यांकडून तपासणी

या संदर्भात स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीदेखील उपस्थित होते. १४ एप्रिल रोजी ही पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये कित्रिडगे रोड पंपिंग स्टेशनपासून मैला आणि सांडपाण्याची पाईपलाईन ही पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी जोडण्यात आलेल्या लाईनला जोडण्यात आल्याचे आढळले. कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग येथे मैल्याची लाईन चुकून जोडली गेल्याचे आढळले आहे.

कंत्राटदाराला नोटीस

महापालिकेने या प्रकरणी कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे. संबंधित कंत्राटदाराला पालिकेकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, मैल्याची पाईलपाईन चुकीच्या पद्धतीने जोडल्याने मैला सांडपाणी समुद्रात मिसळत आहे. याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. तातडीने त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असे नोटीसच्या माध्यमातून कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mumbai : कफ परेड परिसरात सांडपाणी थेट समुद्रात; असह्य दुर्गंधीने नागरिक हैराण Description: Mumbai : गेल्या महिनाभरापासून कफ परेड परिसरात मैला मिश्रित सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जात आहे. नागरिकांना असह्य दुर्गंधीला सामोरे जावे लागत असून महापालिकेने याप्रकरणी कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.
Loading...
Loading...
Loading...