मुंबई : मुंबईत वांद्रे येथे गझेबो शॉपिंग नावाच्या दुकानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना गुरुवार ११ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ७.२०च्या सुमारास घडली. बाइकवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गझेबो शॉपिंग नावाच्या दुकानाबाहेर हवेत गोळीबार केला. यानंतर रस्त्यावर काही पत्रके फेकली आणि तिथून निघून गेले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची कसून तपासणी केली. ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथून काडतुसे गोळा करून लॅब टेस्टसाठी पाठवली तसेच रस्त्यावर फेकलेली पत्रके तपासणीसाठी जप्त केली. ( Mumbai: Gunshots fired outside Gazebo Shopping on Linking Road in Bandra )
'जो कोई भी यहां व्यापार करेगा उसे बख्शा नहीं जाएगा' अशी हिंदी भाषेतील धमकी पत्रकात नमूद आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या भागात तसेच आसपासच्या भागांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जात आहे. धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्यांकडे गोळीबार प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण गझेबो शॉपिंग नावाच्या दुकानाबाहेर आहे. यामुळे गझेबो शॉपिंगचा मालक आणि इतर कोणी यांच्यात वाद झाला होता का, याची चौकशी सुरू आहे. परिसरात इतर कोणत्याही व्यापाऱ्याचे मागील काही दिवसांत कोणाशी काही वाद झाले होते का, याची पण चौकशी सुरू आहे.
गुरुवारी झालेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. पण गोळीबार करणाऱ्यांचा हेतू दहशत पसरविणे हाच होता असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. यामुळे अधिक माहितीसाठी तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी नुपुर शर्मा यांचे समर्थन करणारे मेसेज सोशल मीडियात फॉरवर्ड झाले होते. हे मेसेज फॉरवर्ड केले म्हणून महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा आणि मुंबईत झालेल्या गोळीबाराचे काही कनेक्शन आहे की नाही याचा पण तपास सुरू आहे. गझेबो शॉपिंग या दुकानाच्या मालकाने पोलीस तपास सुरू असल्यामुळे मीडियाशी बोलणे टाळले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.