Corona Mumbai : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता, तज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Corona and omicrona Mumbai मुंबईत दररोज ६७ हजार ते ७२ हजार कोरोना टेस्ट होत आहेत. असे असले तरी मुंबईत याहून अधिक रुग्णसंख्या असू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे सध्या मेडिकलमध्ये कोरोना टेस्ट किट सहज उपलब्ध झाले आहे.

थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा जोर धरला आहे.
  • मुंबईत याहून अधिक रुग्णसंख्या असू शकते
  • ओमिक्रॉनची कुठलीही लक्षणे नसलेली व्यक्ती कोरोना टेस्ट करत नाही.

Corona Mumbai : मुंबई : गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या ४ दिवसांत मुंबईत १९ ते २० हजार दरम्यान रुग्ण आढळले आहेत. मुंबईत दररोज ६७ हजार ते ७२ हजार कोरोना टेस्ट होत आहेत. असे असले तरी मुंबईत याहून अधिक रुग्णसंख्या असू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे सध्या मेडिकलमध्ये कोरोना टेस्ट किट सहज उपलब्ध झाले आहे. हे किट वापरून कोणीही घरच्या घरी कोरोना टेस्ट करू शकतात. तसेच ओमिक्रॉनची कुठलीही लक्षणे नसलेली व्यक्ती कोरोना टेस्ट करत नाही. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (mumbai may have more corona patients corona toolkit and omicron variant )

३१ डिसेंबपारसून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी मुंबईत १९ हजार ४७४ रुग्ण आढळले आहेत. शनिवारच्या तुलनेत मुंबईत रविवारी ४ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली आहे. शनिवारी ६८ हजार २४९ कोरोना चाचणी करण्यात आल्या होत्या. रविवारी त्यात २ हजार ७७० ने घट झाली आहे.  मुंबईत कोरोना चाचणी करण्याचेही प्रमाण कमी झाल्याने रुग्ण अधिक असण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात गुरूवारी कोरोना होण्याचे प्रमाण २९.९० टक्के इतके होते. शुक्रवारी २८.९० टक्के, शनिवारी २८.६० टक्के तर रविवारी हे प्रमाण २८.५३ टक्के इतके होते. सामान्य नागरिकांना कोरोनाची कुठलीच लक्षणे जाणवत नसल्याने ते कोरोना चाचणी करत नाहीत. तसेच घरच्या घरी कोरोना किटमुळे कोरोना चाचणी करणे शक्य असल्याने नागरिकांचा कल कोरोना किट वापरण्याकडे आहे. या काळात मुंबईत कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण हे १५ टक्के होते त्यात वाढ होऊन हे प्रमाण २१ टक्के  इतके झाले आहे. 

मुंबईत सामान्य नागरिक कोविड कीट वापरून टेस्ट करत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या किती आहे हे सांगणे कठीण असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ, शशांक जोशी यांनी दिली आहे. म्हणून कोरोना दुपटीचे प्रमाण, कोरोना रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण, ऑक्सिजची गरज, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची गरज यावर लक्ष ठेवून असल्याचे जोशी यांनी नमूद केले. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेही रुग्ण वाढले असतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. 

बाजारात कोरोन चाचणीसाठी अनेक सेल्फ किट उपलब्ध आहेत. त्यात मायलॅबची कोव्हिसेल्फ, मेरील डायग्नोस्टिकचे कोविफ़ाईंड, अबॉट कंपनीचे पॅन बायो या किट्सचा समावेश आहे. आयसीएमआरने या किट्सना मान्यता दिली असून मेडिकलमध्ये हे किट्स २५० ते ३५० रुपयांना मिळतात. 

गेल्या एक आठवड्यात या किट्सच्या विक्रीत ७०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मेडिकल चालकांनी म्हटले आहे. लोक हे किट विकत घेतात आणि घरच्या घरी कोरोना चाचणी करतात. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास घरीच आयसोलेट होऊन उपचार घेतात. गेल्या आठवड्यात एकट्या मुंबईत अशा ५ लाख किट्स विकल्या गेल्या आहेत. असे असले तरी गेल्या दोन दिवसांत या किट्सच्या मागणीत घट झाली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांत मुंबईत सेल्फ किट्सच्या माध्यमातून ३ हजार रुग्ण आढळले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी