मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी हॉस्पिटलमध्ये

mumbai mayor kishori pednekar admitted in hospital मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांना तब्येत बिघडल्यामुळे सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

mumbai mayor kishori pednekar
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  

थोडं पण कामाचं

  • मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी हॉस्पिटलमध्ये
  • महापौरांची पत्रकारांसोबत झाली होती कोरोना चाचणी
  • पत्रकारांना कोरोना झाल्याचे कळल्यावर महापौर झालेल्या सेल्फ क्वारंटाइन

मुंबईः मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांना तब्येत बिघडल्यामुळे सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. किडनी स्टोनचा त्रास होत असल्यामुळे महापौर पेडणेकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. या नियमानुसार महापौरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. चाचणीचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही. वैद्यकीय पथक कोरोना संकटामुळे लागू असलेल्या नियमांप्रमाणे पुरेशी खबरदारी घेऊन महापौरांवर उपचार करत आहे.

मागील काही दिवसांपासून महापौरांना अस्वस्थ वाटत होते. ताप येणे, पोटात दुखत असल्यासारखे वाटणे अशा स्वरुपाचा त्रास महापौरांना होत होता. त्रास वाढल्यामुळे महापौरांनी वैद्यकीय सल्ला घेतला. डॉक्टरांनी महापौरांना हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. या नंतर महापौर किशोरी पेडणेकर सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. सैफी हॉस्पिटलमध्ये सकाळपासूनच त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू होत्या. किडनी स्टोनचा त्रास असल्याचे निश्चित झाल्यावर तातडीने महापौरांवर उपचार सुरू करण्याचा निर्णय झाला. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

महापौर जेव्हा नर्स होतात

कोरोना संकटात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील केईएम, नायर, शताब्दी या हॉस्पिटलना भेटी दिल्या. महापौर होण्याआधी नर्स म्हणून काम केले असल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढावा यासाठी त्यांनी नर्सचा गणवेष परिधान करुन नायर हॉस्पिटलला भेट दिली होती. मुंबईत काही कोरोना रुग्ण गायब असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात येताच महापौरांनी प्रकरणाचा आढावा घेतला आणि योग्य त्या कारवाईसाठी सूचना दिल्या.  

महापौरांची पत्रकारांसोबत झाली होती कोरोना चाचणी

काही आठवड्यांपूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे निवडक पत्रकारांच्या कोरोना चाचण्या झाल्या होत्या. मनपा, मंत्रालय आणि निवडक हॉस्पिटल या ठिकाणांना नियमित भेटी देत असलेल्या पत्रकारांना कोरोनाचा मोठा धोका असल्यामुळे या चाचण्या झाल्या होत्या. महापौर किशोरी पेडणेकर याप्रसंगी उपस्थित होत्या. त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली होती. 

पत्रकारांना कोरोना झाल्याचे कळल्यावर महापौर झालेल्या सेल्फ क्वारंटाइन

पत्रकारांच्या कोरोना चाचण्या झाल्यानंतर काही पत्रकारांना लक्षणे न दिसणारा किरकोळ स्वरुपाचा कोरोना झाल्याचे जाहीर झाले. कोरोनाबाधीत पत्रकारांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. काही पत्रकारांना घरात आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. या घटनेनंतर पत्रकारांशी नियमित संवाद साधणाऱ्या महापौरांनी स्वतःला महापौर निवास येथे सेल्फ क्वारंटाइन केले. महापौरांना कोरोना झालेला नाही असे चाचणी करणाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र महापौरांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस सेल्फ क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. सेल्फ क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर महापौर पुन्हा सक्रीय झाल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी