Mumbai Police failed, Deputy Chief Minister confessed : मुंबई : मुंबई पोलीस एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला एसटी कर्मचारी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यापर्यंत येत असल्याची माहिती नव्हती. पण मीडियाकडे ही माहिती पोहोचली होती; अशी जाहीर कबुली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली.
एसटी कर्मचारी आझाद मैदान येथे आंदोलन करत होते. तिथून एक गट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याबाहेर आला. जोरदार आंदोलन झाले. बंगल्याच्या दिशेने चपला आणि दगड भिरकावण्यात आले. हे सर्व मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाले. पण बंगल्याबाहेर पोलिसांचा ताफा मर्यादीत दिसत होता. कोणतीतरी शक्ती आंदोलकांच्या पाठीशी होती, असेही अजित पवार म्हणाले.
कोर्टाचा निर्णय आल्यानंतर अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मग अचानक काय घडले, कोणी चिथावणी दिली आणि सिल्व्हर ओक बंगल्याबाहेर का आंदोलन झाले या प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी शोधली पाहिजे; असे अजित पवार म्हणाले.
बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्यांपैकी एकाने १२ एप्रिलला बारामतीत जाणार असं म्हटल्याचं कळतंय. या प्रकरणात तथ्य आहे की नाही याचाही पोलिसांनी तपास करावा असे अजित पवार म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांनी बाजू कोर्टात मांडणारे वकील गुणरत्ने सदावर्ते तसेच १०० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना मुंबई पोलीस आज कोर्टात हजर करणार आहेत. पोलिसांनी आझाद मैदान येथे आंदोलन करणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना रात्री मैदानातून हटविले. यानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या परिसरात बसून आंदोलन सुरू केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.