पोलिसांनी शेतातून जप्त केलं कोट्यवधींचं सोनं

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 29, 2022 | 11:23 IST

Mumbai Police seize crores of gold from fields : मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने राजस्थानच्या शेतामधून कोट्यवधी रुपयांचं सोनं जप्त केलं. सोनं शेतामध्ये पुरुन ठेवलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली.

Mumbai Police seize crores of gold from fields
पोलिसांनी शेतातून जप्त केलं कोट्यवधींचं सोनं  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी शेतातून जप्त केलं कोट्यवधींचं सोनं
  • चोरट्यांनी दुकानातून ८.१९ कोटी रुपयांचं सोनं आणि ८.५७ लाखांची रोख रक्कम चोरली होती
  • ८९ टक्के चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला

Mumbai Police seize crores of gold from fields : मुंबई : मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने राजस्थानच्या शेतामधून कोट्यवधी रुपयांचं सोनं जप्त केलं. सोनं शेतामध्ये पुरुन ठेवलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली.

भुलेश्वर परिसरातल्या एका सोन्याचांदीच्या व्यावसायिकाच्या कार्यालयातून सोन्याची चोरी झाली. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली. तपास सुरू झाला. व्यावसायिकाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी झाली. ज्या कर्मचाऱ्यांविषयी पोलिसांना संशय वाटला त्यांच्याविषयी खबऱ्यांच्या मदतीने आणखी माहिती मिळवायला सुरुवात झाली. 

चौकशीअंती पोलिसांनी व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या गणेश हिरामण कुमार देवासी याला आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली. तिघांकडून मिळालेल्या माहितीआधारे आणखी सात जणांना अटक करण्यात आली. पोलीस आणखी दोन जणांना शोधत आहेत. चोरट्यांनी राजस्थानच्या शेतात सोनं लपवून ठेवल्याची कबुली दिली. यानंतर मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत शेतात पुरलेलं सोनं बाहेर काढण्यात आलं. 

चोरट्यांनी दुकानातून ८.१९ कोटी रुपयांचं सोनं आणि ८.५७ लाखांची रोख रक्कम चोरली होती. यापैकी ८९ टक्के चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

दक्षिण मुंबईत ताडदेव परिसरात राहणाऱ्या खुशाल टामका यांचा सोन्याचांदीचा व्यवसाय आहे. गोरेगावमध्ये कारखाना आणि दक्षिण मुंबईतील भुलेश्वरमध्ये व्यावसायिक कार्यालय आहे. टामका यांच्या कारखान्यात तयार झालेले दागिने अनेक व्यावसायिकांकडे विक्रीसाठी जातात. 

डिसेंबर २०२१ मध्ये वांद्रे कुर्ला संकुलात एक दागिन्यांचे प्रदर्शन होते. या प्रदर्शनासाठी टामका यांच्या कारखान्यातून दागिने जाणार होते. पण कोरोनामुळे प्रदर्शन रद्द झाले. यामुळे प्रदर्शनात पाठविण्यासाठी कारखान्यातून कार्यालयात आणलेले दागिने परत पाठविण्याऐवजी दक्षिण मुंबईतल्या व्यावसायिकांकडे परस्पर विक्रीसाठी पाठविण्याची योजना टामका यांनी आखली. या संदर्भात टामका आणि काही व्यावसायिकांची चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असल्यामुळे टामका यांनी कार्यालयातील तिजोरीत दागिने ठेवले होते. तिजोरीची एक चावी गणेश हिरामण कुमार देवासी याच्याकडे होती. याच चावीचा गैरवापर करून गणेश हिरामण कुमार देवासी याने १३ जानेवारीच्या रात्री मित्रांच्या मदतीने सोनं आणि रोख रकमेची चोरी केली. चोरी करून गणेश हिरामण कुमार देवासी आणि त्याचे मित्र पळून गेले. या प्रकरणी टामका यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

पोलिसांनी तक्रारीआधारे तपास सुरू केला. गणेश हिरामण कुमार देवासी याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची माहिती काढण्याचे काम वेगाने सुरू झाले. पोलीस पथकाने राजस्थान आणि मध्यप्रदेश येथून मुख्य आरोपी गणेश हिरामण कुमार देवासी, किसन प्रल्हाद चौहान आणि रमेश प्रजापती या तिघांना अटक केली. आरोपींची चौकशी केली त्यावेळी नवी माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींनी पोलीस मागावर असल्याचा अंदाज येताच राजस्थानमधील नऊ जणांमध्ये काही दागिने वाटले. हे दागिने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवण्याचा निर्णय झाला. रमेश प्रजापतीच्या राजस्थानमधील शेतात सुमारे ४ कोटी १५ लाख रुपयांचे दागिने पुरून ठेवण्यात आले. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या पथकाने शेतात पुरलेला मुद्देमाल शोधून जप्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी