रवी पुजारीला मुंबईत आणणार

mumbai police will get custody of gangster ravi pujari गँगस्टर रवी पुजारीला मुंबईत आणले जाण्याची शक्यता वाढली आहे.

mumbai police will get custody of gangster ravi pujari
रवी पुजारीला मुंबईत आणणार 

थोडं पण कामाचं

  • रवी पुजारीला १० दिवसांची पोलीस कोठडी
  • रवी पुजारीला मुंबईत आणणार
  • मुंबईत २०१५च्या एका हत्येप्रकरणी खंडणी विरोधी पथक चौकशी करणार

मुंबई: हत्या, खंडणी वसुली तसेच बॉलिवूड सेलिब्रेटी, व्यावसायिक आणि बिल्डर यांना खंडणीसाठी धमकावून चर्चेत आलेल्या रवी पुजारीला कर्नाटक पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात सेनेगलमधून ताब्यात घेतले होते. बंगळुरूतील कोर्टाने पुजारीला १० दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे रवी पुजारीला मुंबईत आणले जाण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्रातील गुन्ह्यांसाठी रवी पुजारीची चौकशी करायची असल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्याकरिता मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. मुंबईत २०१५च्या एका हत्येप्रकरणी खंडणी विरोधी पथक रवी पुजारीची चौकशी करण्यासाठी तयारी करत आहे. (mumbai police will get custody of gangster ravi pujari)

रवी पुजारी विरोधात जळपास २०० गुन्ह्यांची नोंद आहे. यातील ९० गुन्हे एकट्या कर्नाटकमधील आहेत. रवी पुजारी विरोधात बंगळुरूत ३९ आणि मंगळुरूत ३६ गुन्हे आहेत. उडीपीत ११, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा, गुजरातमध्ये ७५ गुन्हे तसेच मुंबईत ४९ गुन्हे आहेत. यापैकी २६ प्रकरणांमध्ये रवी पुजारी विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील अनेक गुन्ह्यांच्या चौकशीसाठी ठिकठिकाणच्या पोलिसांना त्याचा ताबा हवा आहे. 

रवी पुजारी २००९ ते २०१३ या काळात प्रचंड सक्रीय होता. सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना रवी पुजारीने याच काळात धमकावले होते. तसेच त्याने २०१७-१८ मध्येही अनेक सेलिब्रेटींना धमकावले होते. रवी पुजारी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या यांच्यातील लागेबांधे तपासण्यासाठी तसेच अन्य गुन्ह्यांसाठी मुंबई पोलिसांना त्याचा ताबा हवा आहे. रवी पुजारीचा ताबा लवकर मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

बंगळुरूच्या कोर्टाने मुंबईत नेताना रवी पुजारी याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. याआधी काही महिन्यांपूर्वी रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक झाली. काही दिवसांतच तिथून जामीन मिळवून तो दक्षिण आफ्रिकेला फरार झाला. अखेर दक्षिण आफ्रिकेत रवी पुजारीला अटक करण्यात आली आणि त्याला तातडीने सेनेगलला हस्तांतरित करण्यात आले. सेनेगलमधून फेब्रुवारी २०२० मध्ये रवी पुजारीला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुजारीची कर्नाटकमध्ये दीर्घ काळ चौकशी झाली, आता कोर्टाने १० दिवसांची पोलीस कोठडी दिल्यामुळे पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.

रवी पुजारी विरोधात बिल्डर ओमप्रकाश कुकरेजाची हत्या आणि खासदार माजीद मेमन यांच्या हत्येचा प्रयत्न हे दोन गंभीर गुन्हे आहेत. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर रवी पुजारीला अटक करण्यात आली. परदेशातून भारतात आणण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांमध्ये अबू सालेम, छोटा राजन, एजाझ लकडावाला पाठोपाठ आता रवी पुजारी याचाही समावेश झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणाही काही प्रकरणांमध्ये रवी पुजारीची चौकशी करण्यासाठी उत्सुक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी