मुंबईत पहिलीच्या विद्यार्थीनीवर शाळेतील बाथरूममध्ये लैंगिक अत्याचार

मुंबई
Updated Dec 14, 2019 | 13:07 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

मुंबईतील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिलीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उजाली असून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

mumbai school girl sexual assault washroom toilet private part malvani police maharashtra crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिलीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं वृत्त समोर येत आहे. शाळेतीलच बाथरूममध्ये तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य घडलं आहे. १२ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत शिकणारी पीडित मुलगी गुरुवारी शाळेतून घरी परतली. शाळेतून घरी आलेली आपली मुलगी एकदम शांत बसली असल्याचं लक्षात येताच तिच्या आईने विचारपूस केली. यावेळी पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या गुप्तांगावर जखम असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं.

या घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अधिक तपास करत आहेत. शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांचं एक पथक तात्काळ शाळेत दाखल झालं आणि त्यांनी चौकशी सुरु केली. मात्र, पीडित मुलीसोबत केलेलं हे कृत्य एखाद्या विद्यार्थ्याने केलं आहे की शाळेतील स्टाफपैकी कुणी केलं आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. 

शाळेतील विद्यार्थीनीसोबत असं कृत्य घडल्याची माहिती मिळताच पीडित मुलीच्या पोलकांसोबत इतरही पालक शाळेत दाखल झाले. यावेळी आक्रमक पालकांनी आक्रमक होत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.

हैदराबाद प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर

हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादाय घटना गेल्या महिन्यात घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद दिसून आले. देशभरात आंदोलनं, निदर्शने झाली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपींना क्राईम सीन रिक्रिएशनसाठी घटनास्थळी नेलं यावेळी आरोपींनी पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एन्काउंटरमध्ये चारही आरोपी मारले गेले. या एन्काउंटर नंतर देशभरातील नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचं स्वागत केलं तर काहींनी या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी