Narayan Rane Press Conference : पाडव्याच्या दिवशी राणेंची आतिषबाजी; मुख्यमंत्री, शरद पवार, नवाब मलिकांवर हल्लाबोल

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 05, 2021 | 17:05 IST

Narayan Rane Press Conference :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे दोन दिवसांपूर्वी बारामती (Baramati) दौऱ्यावर गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी बारामतीचं कौतुक करताना विरोधकांवर हल्ला चढवला.

Narayan Rane Attack on Chief Minister, Sharad Pawar, Nawab Malik
पाडव्याला राणेंची आतिषबाजी, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बारामतीत फुटलेल्या त्या फटाक्यांना फक्त वास; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
  • दादरा नगर हवेली पोटनिवडणूक व इतर विषयांवरुन आघाडी सरकारवर टीका.
  • दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील. - नारायण राणे

Narayan Rane Press Conference : मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे दोन दिवसांपूर्वी बारामती (Baramati) दौऱ्यावर गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी बारामतीचं कौतुक करताना विरोधकांवर हल्ला चढवला. फटाके वाजवा पण धूर सोडू नका, असं ते म्हणाले होते. हाच धागा पकडत आज केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री (Union Minister for Micro, Small and Medium Enterprises ) नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. आवाज न करणारे आणि धूर न करणारे फटाके फक्त आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात, असाच एक फटाका आज बारामतीमध्ये फुटल्याचा खोचक टोला मंत्री नारायण राणेंनी लगावला. 

नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दादरा नगर हवेली पोटनिवडणूक व इतर विषयांवरुन आघाडी सरकारवर त्यांनी  जोरदार टीका केली. बारामतीमध्ये पवार कुटुंबियांनी दिवाळी साजरी केली, यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावर निशाणा साधत नारायण राणे म्हणाले, हा उद्धव ठाकरेंनी सांगितलेल्या फटाक्यांमधील एक आहे. 

आधी टीका आता पवारांचं कौतुक 

बारामतीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचे कौतुक केलं. त्यावर टीका करताना राणेंनी उद्धव ठाकरेंच्या काही वक्तव्यांची आठवण करुन दिली. महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेची नारायण राणेंनी आठवण करुन दिली. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका करताना वापरलेली विधाने नारायण राणेंनी पत्रकारांसमोर वाचून दाखवली आहे. 
शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या.

काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. मुख्यमंत्री बारामतीला गेले तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलले नाहीत.  एसटी कर्मचाऱ्याचा संपाविषयी नाही. राज्याची अवस्था काय आहे. त्यावर काही बोलत नाही. फक्त बारामतीचे कौतुक केलं. मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून कौतुक सोहळा केल्याचं राणे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंची गद्दारी 

शिवसेना प्रमुखांनी गद्दारीने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केले नव्हते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली होती. याची आठवण करुन देताना शिवसेना प्रमुखांनी नाही तर त्यांच्या पुत्राने भाजपच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री पद मिळाले. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज सगळीकडे धिंदवडे निघत आहेत, असा टोमणा राणेंनी लगावला.

मोदींची मेहरबानी म्हणून निवडून आलात

भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे. आता 56 आमदार आहात. ते मोदींमुळेच निवडून आला आहात. नाही तर 8च्यावर गेला नसता. राजकीय निरीक्षकही त्यावेळी हाच आकडा सांगत होते. मोदींची मेहरबानी म्हणून 56चा आकडा आला. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असं सांगतानाच मुख्यमंत्री काय बोलतात ते कळत नाही. पत्रकारांना कसं कळतं? मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी म्हणून सांगता. पण फटकेबाजी नेमकी काय? मीडियाने आतापर्यंत सांभाळलं, असंही त्यांनी सांगितले.

दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवय 

 दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीवरुनही नारायण राणेंनी सेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. दादरा नगर हवेलीतील एका जागेवर विजय मिळविला आहे. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच थेट आव्हान द्यायला सुरुवात केली. त्यावरून मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. 

देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो, आता दिल्ली काबीज करणार, असा डंका पिटत आहेत. यामुळे आपण  मुद्दामहून विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच आहे,अशी टीका राणेंनी केली. 

राऊत रात्री जे करायचं ते दिवसा करतात 

कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. संजय राऊतांना लिखाण करताना त्यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकाने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील.

चिपी विमानतळाच्या कार्यक्रमात माझ्या टीकेनंतर स्टेजवरुन खाली उतरेपर्यंत उद्धव ठाकरेंचा अबोला  

 काही दिवसांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे नारायण राणे यांच्या कानात काहीतरी बोलले होते. तेव्हा या गोष्टीचा खुलासा होऊ शकला नव्हता. मात्र, नारायण राणे यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत याबाबतचा गौप्यस्फोट केला.

चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी नारायण राणे यांनी आपण भांडाफोड करणार, असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनावेळी नारायण राणे यांच्या कानापाशी जाऊन खोचक टिप्पणी केली होती. तुम्ही भांडी आणलीत का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हे ऐकल्यानंतर मी आज भांडाफोड करायचीच, असे ठरवले. त्यानंतर मी व्यासपीठावर जाऊन बोललो. माझ्या टीकेनंतर उद्धव ठाकरे अगदी स्टेजवरुन खाली उतरेपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. आमच्या दोघांच्या आसनांमधील अंतरही वाढवण्यात आले, असे नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे  यांच्याव नवाब मलिक दररोज आरोप करत आहेत. यावरुन नारायण राणेंनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. वानखेडेंच्या दररोजच्या वापरातील वस्तू हजारो-लाखो रुपयांच्या आहेत, असं म्हणत वस्तूंच्या किंमतीच मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या होत्या. यावरुनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तुफानी बॅटिंग केली. लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला राणेंनी लगावला.

नवाब मलिक यांनी 2 नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून इतके पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता. यावेळी मलिकांनी वानखेडे 50 हजारांटे शर्ट पँट वापरतात, असं म्हटलं होतं. 

तुमचं काढलं तर महागात पडेल, राणेंचा मलिकांना इशारा

मलिक काहीही बोलतात. रोज उठसूठ आरोप करत आहेत. वानखेंडेवर त्यांनी आरोप केले आहेत. मला म्हणायचंय, दुसऱ्यांचे पँट शर्ट पाहण्यासाठी ते लोकांच्या बेडरुममध्ये जाताच कशाला, मला त्यांना सांगायचंय की दरा जपून राहा. तुमचं काढलं तर महागात पडेल, असा इशाराही त्यांनी राणेंनी मलिकांनी दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी