मोदींनी सुप्रियासाठी मंत्रिपद आणि मला 'ही' ऑफर दिलेली, शरद पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 04, 2019 | 14:38 IST

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोबत येण्याची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 

मोदींनी सुप्रियासाठी मंत्रिपद आणि मला 'ही' ऑफर दिलेली, शरद पवारांचा गौप्यस्फोट
मोदींनी सुप्रियासाठी मंत्रिपद आणि मला 'ही' ऑफर दिलेली, शरद पवारांचा गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शरद पवारांचा भाजपबाबत मोठा गौप्यस्फोट
  • शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती मोठी ऑफर
  • सुप्रियाला मंत्रिपदाची ऑफर देखील देण्यात आली होती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) राज्यातील राजकीय नाट्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी असा गौप्यस्फोट केला की, राज्यात सत्तास्थापन करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली होती. शरद पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजपची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. 

'राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे मी त्याविषयावर बोलण्यासाठी पंतप्रधानाची वेळ मागितली होती. पण राज्यात राजकीय परिस्थिती विचित्र असताना पंतप्रधान कार्यालयाने नेमकी मला मोदींच्या भेटीची तीच वेळ दिली जेणेकरुन माझ्याविरुद्ध अविश्वास निर्माण व्हावा. मी जेव्हा मोदींना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, पवार साहेब आपण एकत्र काम करुयात. सुप्रिया सुळे देखील संसदेत चांगलं काम करतात. त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद देण्यात येईल.' असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. 

'मोदींनी दिलेली ही ऑफर मी नाकारली. मी मोदींना सांगितलं की, नरेंद्र भाई आपले वैयक्तिक पातळीवर संबंध चांगले आहेत. पण राजकीय पातळीवर आपण एकत्र काम करु शकत नाही. जेव्हा राजकीय व्यासपीठावर देशासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे येतील तेव्हा मी विरोधासाठी विरोध करणार नाही. पण आपण एकत्रित काम करणं शक्य नाही. एवढं सांगून मी निघून आलो.' असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, शरद पवार यांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजपची राजकीय पातळीवर खूप मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. कारण की, यामुळे संपूर्ण देशात आणि विशेषत: राज्यात असा मेसेज गेलाय की, भाजप सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत देखील जाऊ शकते. त्यामुळे आता शरद पवारांनी केलेल्या या दाव्याला भाजप नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

माझ्यामुळे अजितने दिला भाजपला पाठिंबा - शरद पवार 

राज्याच्या राजकारणात भूकंप घडवत एका रात्रीत भाजपला पाठिंबा जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे मला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

महाराष्ट्र विकास आघाडीसंदर्भात मुंबईतील नेहरू सेंटरला झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस आणि माझ्यामध्ये काही कारणावरून टोकाचे वाद झाले. हे वाद सत्ता स्थापनेविषयी नव्हते. त्यामुळे मी त्या ठिकाणाहून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले की, तुम्ही घरी जा आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतो आणि हा प्रश्न सोडवतो. त्यानंतर मी त्या ठिकाणाहून निघून गेल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

'मी नेहरू सेंटरमधून बाहेर पडल्यावर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतर सहकारी उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसशी वाद झाल्यामुळे अजित पवार यांना संताप आला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, सत्ता स्थापनेपूर्वीच काँग्रेस यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद होत असतील तर सरकार स्थापन झाल्यावर काय होईल. त्यामुळे, माझ्याशी झालेल्या वादामुळे त्यांनी तडकाफडकी भाजपशी संपर्क साधला असावा.' असे शरद पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी