Naval Sailor Shoots Self With Servie Pistol On Destroyer : मुंबईत कुलाबा येथील नौदल तळावर एका नौसैनिकाचा गोळी लागून मृत्यू झाला. हॅप्पीसिंह तोमर असे या नौसैनिकाचे नाव होते. युद्धनौकेचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना गोळी लागून तोमरचा मृत्यू झाला. ही मागील तीन वर्षांतील चौथी घटना आहे.
मुंबईत पश्चिम नौदल तळाचे (Western Naval Command or Western Naval Base) मुख्यालय कुलाबा येथे आहे. या कमांडअंतर्गत असलेल्या नऊ फ्रिगेट्स, सात विनाशिका, दहा पाणबुड्या आणि इतर नौकांचा गृहतळही मुंबईतच नौदल गोदीत आहे. यापैकी एका युद्धनौकेवर हॅप्पीसिंह तोमर हा २५ वर्षीय सैनिक कार्यरत होता.
तोमर ज्या युद्धनौकेवर होता ती नौका देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आली होती. तोमर नौकेवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो कर्तव्यावर (ड्युटी) असताना गोळी लागण्याची घटना घडली. पुढच्या ड्युटीवर आलेल्या नौदलाच्या सुरक्षारक्षकाने तोमरचा मृतदेह बघून वरिष्ठांना माहिती दिली. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.
Crime News अल्पवयीन तरुणी बोलत नसल्याने तरुणाने केले धक्कादायक कृत्य
याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये 'आयएनएस आंग्रे' तळावर तैनात असलेल्या अखिलेश यादव या नौसैनिकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता. मृत्यू झाला त्यावेळी बंदूक शेजारी होती. त्यामुळे आत्महत्या असल्याचे पोलीस तेव्हा म्हणाले होते. यानंतर ऑगस्ट २०२०मध्ये लोलगू नायडू या नौसैनिकाने कुलाब्यातील रहिवासी वसाहतीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर ९ जानेवारी २०२१ ला 'आयएनएस बेतवा' या फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौकेवर तैनात जोधपूरचा २२ वर्षीय नौसैनिक रमेश चौधरी याचा मृतदेह गोळी लागलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावेळी मृतदेहाशेजारी त्याची सर्व्हिस बंदूक होती. यामुळे त्यानेही आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. यानंतर आता हॅप्पीसिंह तोमर याचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. यामुळे प्रथमदर्शनी आत्महत्या म्हणता येईल अशा पद्धतीने नौसैनिकाचा मृत्यू होण्याच्या तीन वर्षांत चार घटना घडल्या आहेत.
भूदलात कार्यरत असलेल्या जवानांना अनेकदा दुर्गम भागात कर्तव्यावर राहावे लागते. घरच्यांपासून दूर असलेल्या या जवानांमध्ये काही वेळा नैराश्यातून अथवा तणावातून आत्महत्या केल्याच्या घटना घडतात. अनेकदा अशा आत्महत्या करणाऱ्यांपैकी अनेक जवान सुटी काळात घरी असताना प्रॉपर्टीच्या वादाने त्रस्त असल्याचे आढळले आहे. यामुळे नौसैनिकांच्या आत्महत्यांचीही त्या पद्धतीने चौकशी होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 4 पैकी 2 नौसैनिक आत्महत्या करण्याच्या काही काळ आधी सुटीवरून परतले होते. विशेष म्हणजे आत्महत्या करणारे चारही नौसैनिक पंचविशीच्या आतले होते. यामुळे भूदलापाठोपाठ नौदलातही सैनिक तणावाला सामोरे जात असल्याचे चित्र आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.