मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau - NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या नेतृत्वाखाली डोंगरी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. ड्रग तयार करणाऱ्या डोंगरीतील कारखान्यावर (फॅक्टरी) कारवाई करण्यात आली. ड्रगचा साठा तसेच कोट्यवधींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. दाऊद इब्राहीमच्या टोळीसाठी ड्रगचे काम करणाऱ्या चिंकू पठाण आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी डोंगरी परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये काही डायरी तसेच मोबाइल जप्त केले आहेत. डायरीतील नोंदीचा तपास सुरू आहे. मोबाइलचा तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी सुरू आहे. (NCB recovers Chinku Pathan’s diary with list of 20 drug peddlers, arrests another gang member from Dongri)
चिंकू पठाण, सलमान नासिर पठाण आणि चिंकू पठाण टोळीतील इतर सदस्य डोंगरीतील कारखान्यात ड्रग तयार करुन पेडलरच्या मदतीने विकत होते. त्यांनी मागील पाच वर्षात १५०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ड्रग विक्रीतून मिळालेला पैसा हवाला मार्गे दहशतवादी कारवायांसाठी पुरवण्यात आला. किती पैसा भारताबाहेर गेला आणि किती पैसा देशातच दहशतवाद्यांच्या मदतीसाठी फिरवण्यात आला याची तपासणी सुरू आहे.
जप्त केलेल्या डायऱ्यांमध्ये दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीम आणि फहिम मचमच या दोघांच्या नावाचा उल्लेख आढळला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. सोन्याची तस्करी करणे कठीण झाल्यामुळे दाऊदने त्याच्या हस्तकांकरवी ड्रगचा व्यवसाय सुरू केला. ड्रगच्या व्यवसायात झटपट कोट्यवधी रुपयांची कमाई होत असल्यामुळे दाऊदने या व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले होते. पण एनसीबीच्या कारवाईमुळे दाऊदच्या ड्रगच्या साम्राज्याला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
एनसीबीने डोंगरी परिसरातून २ कोटी १८ लाखांची रोकड जप्त केली तसेच १२ किलो ड्रग आणि शस्त्रांचा साठा जप्त केला. काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. चिंकू पठाण, सलमान नासिर पठाण आणि चिंकू पठाण टोळीतील इतर सदस्यांना अटक करण्यात आली आहे. कारवाईचे तपशील लवकरच सविस्तर स्वरुपात इडी आणि एनआयला देणार असल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली.
डोंगरीतून सुरू असलेल्या ड्रगच्या व्यवसायाचा संबंध हवाला रॅकेट आणि दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या अर्थ पुरवठ्याशी होता. याच कारणामुळे इडी आणि एनआयला तपासाची माहिती देणार असल्याचे एनसीबीने सांगितले. इडी आर्थिक अफरातफर, हवाला रॅकेट, मोठे आर्थिक गुन्हे यांचा तपास करते तर एनआयए दहशतवादी विरोधी कारवाया करते. एनसीबीच्या ताज्या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग रॅकेटला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.