मुंबई: मुंबईतील एमईटी येथे आज (गुरुवार) महाशिवआघाडीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते हजर होते. या बैठकीत समान किमान कार्यक्रमाचा मसुदा देखील तयार करण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच तीनही पक्षांचे नेते अधिकृतरित्या एकत्र आले होते. पण यावेळी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे एवढ्या महत्त्वाच्या बैठकीला अजित पवार मात्र, हजरच नव्हेत. त्यामुळे अजितदादा नेमके गेले तरी कुठे अशीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यातच काल माध्यमांना गुंगारा देण्यासाठी अजित पवार यांनी चांगलीच गुगली टाकली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा ही चर्चा रंगली.
काल नेमकं काय झालं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरून अतिशय झटपट निघाले आणि आपण बारामतीला चाललो असे म्हणत तडकाफडकीने गाडीत बसले. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील ही बैठक रद्द झाल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना सांगितले होते.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाशिवआघाडी होणार आहे. तत्पूर्वी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काल (बुधवार) सायंकाळी समन्वय समितीची बैठक होती. ही बैठक मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये होणार होती. या बैठकीला काँग्रेसचे नेते उपस्थित होते. तर या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सिव्हर ओक बंगल्यात होते. यात शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील उपस्थित होते.
ही बैठक झाल्यानंतर अचानक तडकाफडकी अजित पवार सिल्व्हर ओक बंगल्यातून बाहेर आले. त्यावेळी, अजित पवारांना मीडियाने विचारले, तेव्हा मिटिंग कॅन्सल झाली आहे. कधी होणार ही बैठक असा प्रश्न विचारला तर मला माहिती नाही. मी चाललो बारामतीला. असे म्हणत अजित पवार गाडीत बसले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही या गाडीत होते. पण अजित पवार यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला होता.
शरद पवार यांना भेटल्यानंतर अजित पवार एवढ्या तडकाफडकीने बाहेर का आले?. सिल्व्हर ओक बंगल्यात काही तरी बिनसले आणि त्यांनी तडकाफडकी बंगला सोडला आणि गाडी धरली. अशी चर्चा त्यामुळे माध्यमांमध्ये रंगली होती.
याबाबतच्या सर्व बातम्या पाहून अखेर शरद पवार हे स्वत: घराबाहेर येऊन त्यांनी माध्यमांना सांगितलं की, 'मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठी अजित पवार तसं चेष्टेने बोलले असतील.'
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.