छगन भुजबळांचा शिवसेना प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला मोठा धक्का; सूत्रांची माहिती 

मुंबई
Updated Aug 29, 2019 | 21:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आता लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या दोनच दिवसात भुजबळ सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

bhujbal
छगन भुजबळांचा शिवसेना प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला मोठा धक्का; सूत्रांची माहिती  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची शक्यता
  • छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, लवकरच होणार पक्ष प्रवेश
  • छगन भुजबळांची घरवापसी होणार असल्याची जोरदार चर्चा

मुंबई: विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतं आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये सामील झाले आहेत. ही पडझड एवढी वेगाने सुरु आहे की, नेमकं काय करावं याबाबत राष्ट्रवादीला देखील काही करावं हे सुचेनासं झालं आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रचंड मोठा धक्का बसणार आहे. कारण की, त्यांचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती पण आता सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, संपूर्ण भुजबळ कुटुंबच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ते देखील गणेशोत्सवाआधीच. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. 

गेले काही दिवस भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत फक्त चर्चा सुरु आहे. सुरुवातीला त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शवला जात होता. पण 'मातोश्री'ची समजूत काढण्यात भुजबळांना यश आलं असल्याचं समजतं आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या प्रवेशासाठी जोरदार घडामोडी घडत असल्याचं समजतं आहे. यामुळे आता लवकरच भुजबळांचा शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. अशावेळी राष्ट्रवादीतून बडे नेते बाहेर पडत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला विरोधी पक्ष नेमका कसा सामोरा जाणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे पुढील २-३ दिवसातच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेतूनच सुरु झाला होता. त्यामुळे शिवसेनेची नेमकी रचना काय आहे याची योग्य जाणीव भुजबळांना आधीपासूनच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात जाण्यासाठी आता भुजबळ देखील सज्ज झाले आहेत. 

एकीकडे भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी आज यासंबंधी स्पष्ट संकेत देखील दिले आहेत. तर तिकडे भाजपमध्ये देखील जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. कारण आता अशीही चर्चा सुरु आहे की, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह इतरही अनेक नेते भाजपमध्ये जाणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...