मुंबई : जून महिन्याचा हा आठवडा राज्य सरकारला विशेषत: शिवसेनेला चांगलाच त्रासदायक ठरत आहे. सोमवारी विधान परिषदेत ग्रेस पास झाल्यानंतर आपण कुठे कमी पडलो असं विचार विमर्श करण्याआधीची एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष प्रमुखासह अख्या सरकारमधील नेत्यांची झोप उडवून ठेवली आहे. काल रात्रीपासून गायब झालेले एकनाथ शिंदे सकाळी सुरतेत असल्याची बातमी कळल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. हॉटेलमध्ये एकटेच शिंदे नसून त्यांनी अख्या 25 ते 30 लोकांचा घोंळकाच तिकडे हलवला असल्याचं माध्यामांनी सांगितल्यानंतर राज्यातील राजकारणाला मोठा धक्का बसला. अशात भाजप सत्तेत येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज होते. त्यांना भाजपसोबत युती हवी होती. जर महाविकास आघाडीची स्थापना होत असताना शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त देखील केली होती. यामुळे आता परत ते आपल्या इच्छा व्यक्त करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याचे वृत येत असल्यानं शिवसेनेचे शेर दिल नेते संजय राऊत यांना पुढे येत पत्रकार परिषद घ्यावी लागली. शिंदे गायब झाल्यानंतर कोणीच माध्यमांशी बोलू नये असा आदेश मातोश्रीमधून बाहेर आला. दरम्यान एकनाथ शिंदे कोणत्या हॉटेलवर आहेत, काय रुम नंबर आहे, तेथे काय परिस्थिती आहे. किती आमदारांची संख्या त्या हॉटेलवर आहे हे सर्व माहिती माध्यामांनी दिली.
या काळात माध्यमांशी कोण बोलणार आणि काय बोलायचं याचा अभ्यास करून संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली असावी. एकनाथ शिंदे का नाराज आहेत त्यांची मागणी का यासर्वांवर चर्चा होत आहे. शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याशी बोलणार असून आपल्या मागण्या ते सांगतील. संजय राऊत यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला असून ते वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहेत. ते बंड करणार नाहीत असं वारंवार सांगत असताना राऊतांनी यावेळी त्यांना एक सूचक इशारा देखील दिला आहे. दरम्यान वरिष्ठ नेत्याला चर्चेसाठी बोलवल्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या मागण्याची अट ठेवतील. त्यातील एक अट अशी एकनाथ शिंदे हे भाजपशी युती करण्याची अट ठेवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची अट ठेवतील.
एकनाथ शिंदे यांची नाराजी महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून सुरू झाली असल्याची चर्चा आहे. राज्यात भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. शिवसेनेसोबत असलेली निष्ठा आणि पक्षातील स्थान यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्याची धुरा गेली.
एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचे खाते देण्यात आले. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी डावलण्यात आल्याची सल त्यांच्या मनात होती. राज्य सरकारमध्ये नगरविकासह महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना मनासारखं काम करू दिले जात नसल्याचे म्हटले जात होते. मंत्री म्हणून एखाद्या फाईलवर सही करण्याआधी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनांची प्रतिक्षा करावी लागत होती, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यामुळेही शिंदे नाराज होते.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत खाती वाटपात महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली. ही खाती जनतेशी थेट संबंधित असल्याने पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचा त्यांचा मुद्दा होता. निधी वाटपावरूनही एकनाथ शिंदे नाराज होते. शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याने कामे पूर्ण होत नव्हती. त्याच्या परिणामी लोकांचा रोष वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा नेता संजय पवार यांना पराभूत होण्यास आणि विधान परिषदेत शिवसेनेची मते कमी करण्यात राष्ट्रवादीचा हात असल्याची शंका शिवसैनिकांच्या मनात आहे. हेही एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे कारण आहे.
राज्यसभेत अजित पवारांच्या गटाने फडणवीसांना मदत केली अशी चर्चा होती. त्यामुळे अजित पवारांविरुद्धच्या स्पर्धेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारच्या सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्तम संवाद होता. पण कालांतरानं चित्र पालटलं आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद कमी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत संवाद कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे देखील दुरावले गेले होते. शिवसेनेचे इतर काही नेते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय बनले पण एकनाथ शिंदे यांची आपल्याला डावललं जातंय अशी भावना निर्माण होऊ लागली. याचाच परिणाम आज पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना सरकारमध्ये अधिक महत्व दिलं जात असल्याच्या मुद्द्यावरुनही एकनाथ शिंदे नाराज होते असं सांगण्यात येत आहे. पक्षाबाबतचे निर्णय घेताना एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं याची खंत त्यांच्या मनात होती.
शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षात काही बदल करण्यात येत होते. या संघटनात्मक बदलात एकनाथ शिंदे यांना डावलण्यात येत असल्याचे म्हटले जात होते. काही महत्त्वाच्या निवडणुकांमध्येही शिंदे यांना फारशी जबाबदारी देण्यात आली नव्हती. कधीकाळी शिवसेनेचे 'मॅनेजमेंट' सांभाळणारे एकनाथ शिंदे यांना निवडणूक रणनितीत मागे सारण्यात आल्याने ते दुखावले असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान एकनाथ शिंदें हे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या काही धोरणांमुळे नाराज असलेले एकनाथ शिंदे सुरतेला मुक्कामी असल्यानं त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. या परिस्थितीत एकनाथ शिंदे आपल्या मागण्या पुढे करू शकतील. यात सर्वात मोठी महत्त्वाच्या अटींमध्ये ते राष्ट्रवादीला दूर ठेवा आणि भाजपशी युती करा अशी अट ठेवतील.
काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंना बोलवण्यात आले होते तेव्हा त्यांनी आपल्या सोबत 20 आमदार नेले होते. शिवसेनेत त्यांना शिंदेंना फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे. नेते मंडळीही कोणत्याही कामासाठी मुख्यमंत्र्यांऐवजी त्यांना भेटत असतं. जरी ते दुसऱ्या खात्यातील कामे असली तरी नेते त्यांच्याकडे येत.
दरम्यान महाविकास आघाडी होण्याआधीही भाजप सोबत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटले गेले असते तर सेनेकडून शिंदेंचे नाव पुढे येत होते. परंतु ती बोलणी फिस्कटल्यानं महाविकास आघाडी स्थापित झाली. यातही शिंदेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं. मुख्यमंत्री पद आपल्याला भेटावं असं त्यांना वाटतं होतं. परंतु त्यावेळीही त्यांना डावलण्यात आलं. शरद पवार यांनी पाठिंब्यासाठी अट ठेवत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्यास सांगितलं. म्हणजेच काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तर राष्ट्रवादी पाठिंबा देणार अशी अट शरद पवार यांनी ठेवली होती.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.