सचिन वाझेला ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी, वाझे प्रकरणात पुढे आले अनिल परबांचे नाव

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2021 | 00:17 IST

मुंबई पोलीस दलातून निलंबित झालेल्या सचिन वाझे याला ९ एप्रिल २०२१ पर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचा आदेश एनआयए कोर्टाने दिला.

nia court extends custody of sachin vaze till 9 april 2021
सचिन वाझेला ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी 

थोडं पण कामाचं

  • सचिन वाझेला ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी
  • वाझे प्रकरणात ५० पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली
  • अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज जप्त

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणे आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन प्रकरणांमध्ये संशयित आरोपी असलेला सचिन वाझे याच्या एनआयए कोठडीत वाढ झाली. मुंबई पोलीस दलातून निलंबित झालेल्या सचिन वाझे याला ९ एप्रिल २०२१ पर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचा आदेश एनआयए कोर्टाने दिला. तसेच सीबीआयला एनआयए कोठडीत असलेल्या वाझेची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हिरेन हत्या प्रकरणात निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. nia court extends custody of sachin vaze till 9 april 2021

वाझे प्रकरणात ५० पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष एनआयएने घेतल्याचे सांगितले. एका संयुक्त बँक खात्याची चौकशी सुरू आहे. यात वाझे हा खातेदार आहे. तसेच आणखी एक खातेदार आहे. या खात्याची सखोल चौकशी सुरू आहे. वाझे प्रकरणात स्कॉर्पिओ, इनोव्हा, काळी मर्सिडिझ बेंझ, निळी मर्सिडिझ बेंझ, लँड क्रूझर प्राडो, वॉल्वो, आऊटलँडर आणि ऑडी या आठ गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच वाझेची मैत्रीण मीना जॉर्ज हिची साडेसात लाखांची बाइक जप्त करण्यात आली आहे.

वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तपास सुरू असतानाच वाझे मुंबईत ज्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काही काळ वास्तव्यास होता तिथल्या फूटेजमध्ये एक महिला आढळली. ही महिला वाझेसोबतच फिरत असल्याचे दिसले. यानंतर एनआयएने महिलेला शोधून विमानतळावरुन अटक केली. 

अटक केलेली महिला नोटा मोजण्याचे यंत्र वापरुन हॉटेलच्या खोलीत बसून नोटा मोजत होती. नंतर वसुली करुन गोळा केलेला बेहिशेबी पैसा (काळा पैसा) वेगवेगळ्या मार्गाने फिरवण्याचे काम करत होती. महिलेच्या मिरा रोड येथील फ्लॅटची झडती घेण्यात आली. नोटा मोजण्याचे यंत्र जप्त करण्यात आले. एनआयएने वाझे प्रकरणात ताब्यात घेतलेल्या गाड्यांपैकी एका गाडीतून नोटा मोजण्याचे एक यंत्र आधीच जप्त केले आहे. 

वाझे याच्या हालचालींचा मागोवा घेताना एनआयएने अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. वाझेच्या पोलीस दलातील सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तसेच सचिन वाझे याने पुरावे नष्ट करण्यासाठी मिठी नदीत टाकलेल्या अथवा ठिकठिकाणी लपवून ठेवलेल्या वस्तू आणि गाड्या यांची जप्ती सुरू झाली. सचिन वाझे याने मागील काही दिवसांत कागदोपत्री केलेल्या नोंदींचा तपास करण्यासाठी अनेक कागदपत्रे तसेच मोबाइल, आयपॅड, कॉम्प्युटर अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जप्ती करण्यात आली आहे.

वाझे प्रकरणात पुढे आले अनिल परबांचे नाव

एनआयए कोर्टात सुनावणी सुरू असताना सचिन वाझे याने एक पत्र सादर केले. एनआयए कोर्टाने कायद्याच्या चौकटीत राहून पत्र सादर करण्यास सांगितले. हे पत्र लवकरच प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात एनआयए कोर्टात सादर होण्याची शक्यता आहे. या पत्रात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शंभर कोटी वसूल करायला सांगितल्याचा उल्लेख आहे. अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या ५० भ्रष्ट कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी अशा प्रकारे वसुली करण्यास सांगितल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच एसबीयुटी (सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट) या संस्थेचा कारभार नियंत्रित करणाऱ्यांकडून ५० कोटींची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. अद्याप या प्रकरणात कोणतीही शहानिशा झालेली नाही. मात्र महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रातील आरोप फेटाळले. माझ्या मुलींची आणि बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो अशा शब्दात अनिल परब यांनी पत्रातील आरोप फेटाळले. तसेच पत्रामागे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप केला. राज्यातील सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असाही आरोप अनिल परब यांनी केला.

पत्रात अजित पवारांचे नाव

वाझेच्या पत्रात अनिल परब यांच्या व्यतिरिक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव आहे. मात्र अजित पवार यांनी या प्रकरणात अद्याप भाष्य केलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी