Koshari Statement Controversy : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील भाजप वगळता सर्व प्रमुख पक्षांनी कोश्यारींच्या विधानाची निषेध केला असून त्यांच्यावर कडक भाषेत टीकाही केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी मात्र कोश्यारींच्या विधानाचं समर्थन केलं असून या विधानाचा निषेध कऱणाऱ्यांनाच खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे एकंदरच भाजपकडून राज्यपालांच्या विधानाला पाठिशी घातले जाणार, असे संकेत मिळत आहेत.
नितेश राणे यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्यपालांच्या विधानातून कुणाचाही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले, असा सवाल त्यांनी केला आहे.
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. — nitesh rane (@NiteshNRane) July 30, 2022
त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..
त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..
राज्यपालांच्या विधानाचा निषेध करणाऱ्यांनी किती मराठी तरुणांना मुंबई महापालिकेत कॉन्ट्रॅक्ट दिले, असा सवालही त्यांनी विचारला आहे. शिवसेनेचं नाव न घेता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी शाह आणि अग्रवालच का हवे असतात, असा सवाल त्यांनी केला आहे. एवढेच कशाला, तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदीकडे देऊन ठेवली आहे, ते चालतं का? असा सवालही त्यांनी केला आहे. आर्थिक व्यवहारांवेळी मराठी माणूस आठवला नाही का, असा सवालही त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता उपस्थित केला आहे.
अधिक वाचा - गुजराती आणि राजस्थानींमुळे मुंबई आर्थिक राजधानी - कोश्यारी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षांनी निषेध केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेनेचा शिंदे गट आणि मनसेनंदेखील राज्यपालांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. मुंबई ही इथल्या कामगारांच्या जीवावर देशाची आर्थिक राजधानी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे, तर राज्यपालांची महाराष्ट्रद्रोही विधानांचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. आता तरी पेटून उठा, अशी हाक शिवसेनेनं दिली आहे, तर मनसेनंही या विधानाचा निषेध केला आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही या विधानाचा निषेध केला आहे.
राज्यपालांच्या या विधानावर भाजपकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत असताना भाजपने मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा - ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती
शुक्रवारी अंधेरी येथील एका चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. तेव्हा कोश्यारी म्हणाले की, मी नेहमी महाराष्ट्रात एक गोष्ट सांगत असतो. आज मुंबई किंवा ठाण्यात गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर एक रुपयाही उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी होण्यात गुजराती आणि राजस्थानी लोकांचा सिंहाचा वाटा आहे असे कोश्यारी म्हणाले. कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.