बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच : शिंदे

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 13, 2022 | 16:30 IST

No deception with Balasaheb Thackeray thoughts says Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले.

No deception with Balasaheb Thackeray thoughts says Eknath Shinde
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच : शिंदे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच : शिंदे
  • विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही : शिंदे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले

No deception with Balasaheb Thackeray thoughts says Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले. । ठाकरे विरूद्ध शिंदे

याआधी भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगवले यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. भरत गोगावले सध्या विधानसभेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतोद आहेत. यामुळे त्यांचा मुलगा शिंदे गटात प्रवेश करणार याचा अंदाज अनेकांना होता. पण विकास यांच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेतही फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले. 

एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केलेला नाही. पण त्यांनी एकनाथ शिंदे यांना उघडपणे समर्थन दिले आहे. यामुळे खासदारांमध्ये भविष्यात फूट पडली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणाऱ्यांमध्ये श्रीकांत शिंदे हे नाव असेल, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. श्रीकांत शिंदे हे युवासेनेत सक्रीय असलेले खासदार आहेत. यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाणे जिल्ह्यातील युवासेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल अशी चर्चा आहे.

विकास गोगावले यांच्या निर्णयामुळे कोकणातील युवासेनेचा एक मोठा गट लवकरच आदित्य उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मागील काही वर्षांत असंख्य शिवसैनिकांना शिवबंधन बांधले. हे बंधन तोडून शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या विधानसभेतील ४० पेक्षा जास्त आमदारांनी महाविकास आघाडी शिवसेनेसाठी मारक असल्याचे जाहीरपणे बोलायला सुरुवात केली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांतच निष्ठा यात्रेची घोषणा केली. राज्यात निष्ठा यात्रा सुरू असतानाच शिवसैनिकांचे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणे सुरू आहे. 

मंगळवार १२ जुलै २०२२ रोजी मुंबईच्या दहिसर भागातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. यामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फुटीचे चित्र आहे.

आदेश कोणाचा?

शिवसेनेत आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश द्यायचे आणि इतरांनी ते ऐकायचे तसेच पाळायचे अशी पद्धत होती. इतर पक्षांमध्ये असते तशी सर्वाधिकार अमूक एका नेत्याला दिल्याचे जाहीर करणे असा प्रकार शिवसेनेत कधीही नव्हता. आदेश पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने द्यायचा आणि इतरांनी तो अंमलात आणायची अशी व्यवस्था होती. पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी 'शिवसैनिकांच्या आग्रहामुळे' असे कारण देत यशवंत सिन्हा यांच्या ऐवजी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ही घोषणा होऊन २४ तास होण्याच्या आतच शीतल म्हात्रे आणि विकास गोगावले यांनी शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केला आहे. यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादनाचे ट्वीट करत 'बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच' असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. 

मागील काही दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणवून घेत आहेत. याच भूमिकेवर ठाम राहून एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादनाचे ट्वीट केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी