शिवसेनेचे आमदार फोडण्याची कुणाचीही हिंमत नाही: संजय राऊत

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 07, 2019 | 11:22 IST

'शिवसेनेच्या वाऱ्याला कुणीही उभं राहू शकत नाही, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना संपर्क साधण्याची कुणाचीही हिंमत नाही.' अशा शब्दात संजय राऊत यांनी एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

no one dared to splits shiv sena's mla sanjay raut again criticized to bjp
शिवसेनेचे आमदार फोडण्याची कुणाचीही हिंमत नाही: संजय राऊत  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
  • शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न कुणीही करणार नसल्याचा राऊत यांचा दावा
  • शिवसेनेकडून आमदार फुटू नये म्हणून जोरदार मोर्चेबांधणी

मुंबई: एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आज (गुरुवार) राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. पण याचवेळी भाजप काही आमदारांना फोडण्यााच प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे. 'सध्या राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे तशा परिस्थितीत आमदार फोडण्याच्या घटना होतात. अनेक राज्यांमध्ये तसं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण महाराष्ट्रात शिवसेना तशा गोष्टी घडून देणार नाही.' असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. 

'ज्यांच्याकडे बहुमत आहे किंवा १४५चा आकडा आहे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करावा आम्ही त्याचं स्वागतच करतो. पण सध्या सत्ताधाऱ्यांकडून फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. इतर पक्षातील आमदारांना संपर्क साधून त्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधण्याची कुणाचीही हिंमत नाही. शिवसेनेच्या वाऱ्याला देखील कुणी उभं राहू शकत नाही. कारण आमचे आमदार हे निष्ठावान आहेत. ते फुटणार नाहीत.' असं राऊत आज म्हणाले. 

'आम्ही शांत आहोत सध्या सुरु असणाऱ्या घडामोडी आम्ही पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचं वैयक्तिक वैर नाही. पण ही सत्य-असत्याची लढाई आहे. याबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जे लोकसभा निवडणुकीत ठरलं आहे त्यानुसार झालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे.' असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा पुनरुच्चार केला आहे. 

दरम्यान, आजच्या सामनातील अग्रलेखात देखील भाजपवर टीका करण्यात आली आहेत. 'आम्ही फक्त मुद्द्यांचे बोलतो, कुणी गुद्द्यांवर येणार असेल तर आम्ही त्यालाही उत्तर देऊ. गुंडांचा धाक आणि पैशांचा प्रसाद कोणी वाटणार असेल तर आम्ही काही मेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही.' असा थेट इशाराच शिवसेनेने सामनातून दिला आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांमध्ये तणाव आणखी वाढला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी