रोहित पवारांसारख्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या शुभेच्छा आजवर कुणीही दिल्या नसतील!

मुंबई
रोहित गोळे
Updated Feb 14, 2020 | 15:00 IST

कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देताना अतिशय उपहासात्मकपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

no one has ever wished you valentine's day like mla rohit pawar
रोहित पवारांसारख्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या शुभेच्छा आजवर कुणीही दिल्या नसतील!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • आमदार रोहित पवारांनी दिल्या आगळ्यावेगळ्या व्हॅलेंटाइन डेच्या पद्धतीने शुभेच्छा
  • व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देताना रोहित पवारांनी केली केंद्र सरकारवर उपहासात्मक टीका
  • रोहित पवारांच्या राजकीय प्रल्गभतेची चर्चा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कायमच राज्यासह देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. कुशाग्र बुद्धीच्या जोरावर गेली अनेक वर्ष त्यांनी राजकारणात आपला स्वत:चा एक ब्रँड तयार केला आहे. पण त्यांच्याच कुटुंबातील आणखी एक नेता अशाच पद्धतीने जनमानसासमोर येत आहे. हा नेता म्हणजे आमदार रोहित पवार. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड या मतदारसंघातून भाजपचे दिग्गज मंत्री राम शिंदे यांचा पराभव करुन रोहित पवार हे जायंट किलर ठरले होते. तेव्हापासून रोहित पवार यांची तरुण नेते म्हणून बरीच चर्चा सुरु झाली. 

संयमी आणि हुशार अशी ओळख बनवलेल्या रोहित पवार यांनी गेल्या काही महिन्यात त्यांची राजकीय प्रल्गभता देखील दाखवून दिली आहे. संयमी वक्तृत्व आणि समोरच्या व्यक्तीच्या काळजाला हात घालण्याची असणारी हातोटी यामुळे अल्पावधीतच त्यांनी आपल्या मतदारसंघात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर देखील रोहित पवार हे तितक्याच प्रगल्भतेने आपली मतं मांडत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीला राजकीयदृष्ट्या कसं वळण द्यायचं हे देखील आता त्यांना चांगलंच अवगत झालं आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरुन आता हे समोर आलं आहे. 

तरुणाचे नेते अशी ओळख असलेल्या रोहित पवारांनी आज तरुणाईच्या आवडीच्या अशा 'व्हॅलेंटाइन डे'च्या सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देताना रोहित पवारांनी ज्या पद्धतीने त्याला राजकीय वळण दिलं आहे त्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. पाहा रोहित पवार यांनी नेमकं ट्वीट तरी काय केलंय. 

 

 

'हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे!
हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.' असं ट्वीट करत रोहित पवार यांनी देशातील केंद्र सरकारवरच टीका केली आहे. तरुणाई ही नेहमीच राजकारणात केंद्रस्थानी असते. त्यामुळे अशा मुद्द्यांच्या आधारे आपली मतं त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे. 

रोहित पवारांनी अवघ्या काही तासांपूर्वी केलेल्या या ट्वीटला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकपणे केलेलं हे ट्वीट अनेकांच्या पसंतीस उतरलं असल्याचं दिसतं आहे. 

दरम्यान, विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत जवळजवळ १५० रुपयांपर्यंत झालेली दरवाढ यावरुन आता केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अनेक राज्यात त्याचा निषेध केला जात आहे. त्यामुळे आता या सिलेंडर दरवाढीबाबत केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी