कुणीही मध्यस्थी करु नये, उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम आहेत; कर्नाटक पॅटर्नचा डाव सुरुयं: संजय राऊत 

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 08, 2019 | 10:51 IST

Sanjay Raut: पडद्यामागून कर्नाटक पॅटर्न सुरु आहे. काळजीवाहू सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.

no one should mediate uddhav thackeray is firm on his role bjp started karnataka pattern in maharashtra says sanjay raut
कुणीही मध्यस्थी करु नये, उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम आहेत; कर्नाटक पॅटर्नचा डाव सुरुयं: संजय राऊत   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • शिवसेना पुन्हा आक्रमक, मध्यस्थी गरज नसल्याचा दावा
  • राज्यात कर्नाटक पॅटर्नचा डाव सुरु असल्याचा संजय राऊतांचा आरोप
  • दिल्लीसमोर शरद पवार झुकले नाही, शिवसेनाही झुकणार नाही: संजय राऊत

मुंबई: राज्यातील सत्तेचा तिढा आज देखील कायम राहणार असल्याचंच चित्र सध्या दिसतं आहे. कारण शिवसेना अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याविषयी आज (शुक्रवार) शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अतिशय आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडली. यावेळी संजय राऊतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, 'कुणीही तिसऱ्या मध्ये पडून मध्यस्थी करण्याची गरज नाही. कारण उद्धव ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.' असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. 

आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत हे अतिशय आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी भाजपवर अतिशय गंभीर आरोप देखील केले. 'राष्ट्रपती राजवटीच्या आडून काळजीवाहू मुख्यमंत्रीपदासाठी डावपेच सुरु आहेत. याच काळजीवाहू माध्यमातून सूत्र हलविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण तसं झाल्यास ही लोकशाहीची हत्या ठरेल. कारण जनतेने पराभव करुन देखील सत्तेत राहण्याचा असा प्रयत्न करणं म्हणजे जनादेशाचा अपमान आहे.' अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. 

नेमकं काय म्हणाले संजय राऊत पत्रकार परिषदेत? 

'माझ्या माहितीप्रमाणे नितीन गडकरी यांचं मुंबईतील वरळीमध्ये घर आहे. त्यामुळे ते मुंबईत येत आहेत ही काही बातमी नाही. तसंच तुम्हाला आधीच स्पष्ट करतो की, कुणाही मध्यस्थीची आम्हाला गरज नाही. कारण उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कुणीही तिसऱ्याने यामध्ये पडण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. पण जर कुणी राष्ट्रपती राजवटीच्या आडून महाराष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे.' अशा स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. 

'आमच्यासाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. आमचे चेहरे पडलेले किंवा काळवंडलेले नाही. आमचे चेहरे पहिल्या दिवसापासून हसतमुख आहे.' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. 

दरम्यान, याचवेळी संजय राऊतांनी भाजपवर घोडेबाजाराचा देखील आरोप केला आहे. काँग्रेस आपले सर्व आमदार जयपूरला नेणार आहेत. या प्रश्नावर संजय राऊत असं म्हणाले की, 'त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या घोडेबाजारासाठी सत्ता आणि पैशाचा वापर सुरु आहे. पडद्यामागून कर्नाटक पॅटर्न सुरु आहे. कुणी कर्नाटक पॅटर्न चालविण्याच प्रयत्न करत असेल तर यशस्वी होणार नाही. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊ.' असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेनेकडे दुसरे पर्याय असल्याचंही अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे.

 

'राज्यात कर्नाटक पॅटर्नचा प्रयत्न सुरु असला तरीही आम्ही झुकणार नाही. शरद पवार हे दिल्लीसमोर झुकले नाहीत. शिवसेना देखील झुकणार नाही. आम्ही कुणासमोरही लाचार होणार नाही.' अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला सुनावलं.  

दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या शेवटी संजय राऊतांनी भाजपवर अतिशय गंभीर असा आरोप केला. 'सध्या राज्यात काळजीवाहू सरकार राहावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काळजीावाहू मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून संपूर्ण सूत्र हलविण्याचा प्रयत्न आहे. पण जनतेने पराभव करुन देखील सत्तेत राहण्याचा असा प्रयत्न करणं हा जनादेशाचा अपमान आहे. महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार राहू नये. असं प्रमुख राजकीय पक्षांना वाटत असेल तर ते घटनात्मकदृष्ट्या योग्यच आहे.' असंही राऊत यावेळी म्हणाले.  

याचवेळी संजय राऊतांनी एक अतिशय मोठं वक्तव्य देखील केलं.  'उद्यापासून या राज्याचे प्रमुख राज्यपाल असतील. त्यामुळे राज्यावर ही वेळ ज्यांनी आणली आहे त्यांना देखील महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल.' असं म्हणत संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, शिवसेनेच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ते भाजपला पाठिंबा देणार नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी