आता उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री योगींना फोन, पाहा काय सांगितलं फोनवर! 

मुंबई
रोहित गोळे
Updated Apr 28, 2020 | 15:42 IST

उत्तरप्रदेशमधील दोन साधूंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

now cm uddhav thackeray's call to chief minister yogi see what he said on the phone about the bulandshahr incident
आता उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री योगींना फोन, पाहा काय सांगितलं फोनवर!   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन
  • साधूंच्या हत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता
  • 'आमच्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी'

मुंबई: उत्तरप्रदेशमध्ये आज (मंगळवार) दोन साधूंची निर्घृणपणे मंदिरातच हत्या करण्यात आली. यावरुन सध्या उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमधील वातावरण तापलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, या घटनेला कोणताही धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन केलं आहे. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन या घटनेविषयी चिंता व्यक्त केली आहे.  

काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंगमध्ये दोन साधूंना जीव गमवावा लागला होता. त्यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. आता उद्धव ठाकरेंनी देखील उत्तरप्रदेश सरकारकडे तशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. 

पाहा उद्धव ठाकरे फोनवर नेमकं काय म्हणाले! 

'मी आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन करतो.' 

नेमकी घटना काय? 

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका मंदिरात दोन साधूंचे मृतदेह सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही साधूंना धारदार शस्त्राने मारण्यात आल्याचे समजते आहे. लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अनुपशहर पोलिस स्टेशन परिसरातील पागोना या गावात असलेल्या शिव मंदिरात ही घटना घडली आहे. दरम्यान, दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून  पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हे साधू मंदिरात झोपले असताना एका गर्दुल्ल्याने त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, २ दिवसांपूर्वीच या साधूंसोबत आरोपीचा वाद झाला होता. येथील स्थानिकांनी अशीही माहिती दिली आहे की, आरोपी हा काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून जामिनावर बाहेर आला होता. तो दरोडा आणि खुनाच्या आरोपाखाली गेले काही दिवस अटकेत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी