Mumbai Mahalaxmi Mandir pure gold dome : मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराच्या कळसाला सोन्याने मढवले जाणार आहे. मंदिराच्या कळसाला दहा कोटी रुपयांच्या सोन्याने इलेक्ट्रोप्लेट केले जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ओमानचे व्यावसायिक एस पेरियासामी करणार आहेत. एस पेरियासामी हे मूळचे कोईम्बतूरचे आहेत. त्यांनी कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांच्या माध्यमातून मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराच्या ट्रस्टशी संपर्क केला आणि मंदिराच्या कळसाला सोन्याने इलेक्ट्रोप्लेट करण्याचा प्रस्ताव सादर केला.
काय आहे मुंबईच्या मुंबादेवी मंदिराचा इतिहास?
गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानमधून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हा हल्ला झाला त्यावेळी एस पेरियासामी मुंबईत होते. हल्ला झाला त्यावेळी मुंबईतून होणारी विमानांची उड्डाणे थांबविली होती. उड्डाणे पूर्ववत सुरू झाल्यानंतरच एस पेरियासामी ओमानला जाऊ शकले.
ओमानमध्ये नोकरी करत असलेल्या एस पेरियासामी यांनी पुढील काही महिन्यांत छोटेखानी व्यवसाय सुरू केला. एका व्यावसायिकाने त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केली. यामुळे मिळालेल्या भांडवलच्या जोरावर एस पेरियासामी यांनी व्यवसायाचा विस्तार केला. आता त्यांचा व्यवसाय १४०० कोटींपेक्षाही मोठा आहे. मुंबईत असल्यापासून एस पेरियासामी यांची मुंबईच्या महालक्ष्मीवर प्रचंड श्रद्धा आहे. देवीने आशीर्वाद द्यावा आणि आपली आर्थिक भरभराट व्हावी अशी इच्छा व्यक्त करत ते अनेकदा महालक्ष्मीला प्रार्थना करत होते. देवीच्या कृपेने भरभराट झाली म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एस पेरियासामी यांनी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराच्या कळसाला सोन्याने मढवण्याचा प्रस्ताव ट्रस्टसमोर सादर केला आहे.
समुद्रकिनारी असलेल्या मंदिरावरून खारे वारे वाहतात. या वाऱ्यांमुळे सोन्यावर परिणाम होऊ नये म्हणून सोन्याच्या थरावर एक विशेष थर लावला जाईल. यामुळे सोन्याचे रक्षण होईल आणि कळसाचं सौंदर्य कायम राहील. या पूर्ण प्रक्रियेचा खर्च पण एस पेरियासामी करणार आहेत.
मुंबई हेरिटेज कमिटीकडून (मुंबई ऐतिहासिक वारसा समिती) परवानगी मिळताच मंदिराच्या कळसाला सोन्याने इलेक्ट्रोप्लेट करण्याचे काम सुरू होणार आहे. मंदिराच्या ट्रस्टने एस पेरियासामी यांच्या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली आहे.
प्रकल्पाचा एकूण खर्च २५ कोटी रुपयांच्या घरात जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. यात दहा कोटींचे सोने असेल आणि खाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होऊ नये म्हणून सोन्यावर विशेष थर लावण्याकरिता आणखी दहा ते पंधरा कोटींचा खर्च होणार आहे. सर्व खर्च करण्याची तयारी एस पेरियासामी यांनी दाखविली आहे.
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवींचे (त्रिमूर्ती) मंदिर म्हणून मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराची ओळख आहे. धाक्जी दादाजी (१७६०- १८४६) नावाच्या व्यापाऱ्याने १८३१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मूळ मंदिर १७८५ मध्ये बांधण्यात आले होते. समुद्रकिनाऱ्यावर बांधलेली संरक्षक भिंत लाटांच्या धडकांमुळे दोन वेळा पडली. याच सुमारास रामजी शिवजी प्रभू नावाच्या मुख्य अभियंत्याला स्वप्नात देवीने दर्शन दिले असे सांगतात. यानंतर वरळीच्या समुद्रात शोध घेऊन देवीच्या मूर्ती शोधण्यात आल्या. या मूर्तींची स्थापना करण्यासाठी मंदिर बांधण्यात आले. मुंबईच्या महालक्ष्मी रेल्वे स्टेशनपासून सुमारे एक किमी अंतरावर महालक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराजवळ त्र्यंबकेश्वर मंदिर आणि महादेव ढकलेश्वर मंदिर आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.