'सुशांतने आत्महत्येच्या आदल्या दिवशी पार्टी केली होती?', मुंबई पोलीस म्हणाले... 

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 03, 2020 | 17:26 IST

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. तसंच याप्रकरणी मुंबई पोलीस सखोल चौकशी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Sushant_Singh_Rajput_Suicide_case
'सुशांतने आत्महत्येच्या आदल्या दिवशी पार्टी केली होती?', मुंबई पोलीस म्हणाले...   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी केली होती आत्महत्या 
  • घरातच गळफास लावून सुशांतने केली होती आत्महत्या 
  • मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस करत आहेत या प्रकरणाचा तपास

मुंबई: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या चौकशी प्रकरणी आता मुंबई पोलिसांवरच गेल्या काही दिवसांपासून संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी आज (सोमवार) एक पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं की, ते या प्रकरणाचा पूर्ण गांभीर्याने तपास करीत आहेत. तसेच संशयितांची देखील चौकशी सुरू आहे. आतापर्यंत ५६ जणांचे जवाब नोंदविण्यात आले असून अद्याप कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही.

सुशांतच्या घरातील सर्व लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, ज्या ५६ जणांचा जवाब नोंदविण्यात आला आहे. त्यात रिया वक्रवर्तीचा देखील सहभाग आहे. एकदा नव्हे तर दोनदा तिचा जवाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय तिला यापुढे देखील बर्‍याच वेळा चौकशीसाठी बोलावले जाईल. दरम्यान याचवेळी परमबीर सिंग यांनी सोमवारी सांगितले की, सुशांत सिंह राजपूत याच्या घरी १३ जून रोजी कोणतीही पार्टी झालेली नव्हती. सकृतदर्शनी असं दिसून आलेलं आहे की, १४ जून रोजी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

परमबीर सिंह म्हणाले, मुंबई पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत आहेत. आम्ही प्रत्येक दृष्टीकोनातून अभ्यास करत आहोत. या संदर्भात आम्ही सुशांतचे कुटुंबीय,  मित्र, डॉक्टर आणि इतरांचे जवाब घेतले आहेत. याशिवाय आम्ही सुशांतच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहारांचीही चौकशी करत आहोत. दरम्यान, या पत्रकार परिषदेत परमबीर सिंह यांना जेव्हा विचारण्यात आलं की, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय व्यक्तीचं नाव समोर येत असल्याची जोरदार चर्चा  सोशल मीडियावर सुरू आहे. यावर परमबीर सिंह म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासात असे कोणतेही तथ्य समोर आलेले नाही.

बिहार पोलिसांचा तपास

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी बिहार पोलीस देखील तपास करत आहे. काही दिवसांपूर्वीच बिहार पोलिसांची एक टीम मुंबईला पोहचली असून सध्या ते सर्व बाबींचा शोध घेत आहेत. सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बिहार पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. याच  तक्रारीच्या आधारे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचा देखील शोध सुरू आहे. तसंच बिहार पोलिसांनी सुशांत राहत असलेल्या फ्लॅटवर जाऊन रिक्रएशन देखील केलं. 

'मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा'

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, 'मुंबई पोलीस प्रत्येक प्रकारे सक्षम आहे. जर मुंबई पोलीस तपास करत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जे सरकारमध्ये नाहीत किंवा सरकारशी संबंधित नाहीत, त्यांनी चौकशीबाबत भाष्य करणे योग्य नाही.' असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी