Eknath Shinde यांच्या मानगुटीवर बसून 'ऑपरेशन कमळ', शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 22, 2022 | 13:20 IST

Operation lotus in Maharashtra with help of Eknath shinde shiv sena editorial saamana slams bjp: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आपल्यासोबत ४० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत येताना दिसत आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde यांच्या मानगुटीवर बसून 'ऑपरेशन कमळ' 
थोडं पण कामाचं
  • विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहा एक आमदारांना उचलून गुजरातला नेण्यात आले. त्यांच्याभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला
  • महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे प्रश्न आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) मधील शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Cabinet Minister Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (CM Uddhav Thackeray) दिला आहे. मविआ सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून सातत्याने मविआला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ सुरू असल्याचं बोललं जात आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

गुजरातमध्ये दांडिया खेळावा पण महाराष्ट्रात तलवार भिडेल

सामना संपादकीयमध्ये म्हटलं, महाराष्ट्रातल्या सरकारचं काय आणि कसं होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्याच, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे प्रश्न आहेत. संकट आणि वादळाचा सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरुन फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरुर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल.

'ऑपरेशन कमळ'

राज्यातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाही. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून 'ऑपरेशन कमळ' घडवीत आहेत. काही करुन राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे असंही सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहा एक आमदारांना उचलून गुजरातला नेण्यात आले. त्यांच्याभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यापैकी दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना इतकी मारहाण झाली की, त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल करावे लागले. तर कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले आणि भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईत दाखल झाले. अशा प्रकारे चार-पात आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि 'ऑपरेशन कमळ' वाल्यांच्या ताब्यात दिले असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे. 

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. आईचे दूध विकणारी अवलाद शिवसेनेत नको असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणा-भाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांजला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा का? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आणि त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भाजपच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेवर वार करा आणि मग महाराष्ट्रावर घाव घाला असे राजकारण स्पष्ट दिसते असंही सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी