हे खपवून घेतलं जाणार नाही...पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

मुंबई
Updated Feb 18, 2020 | 20:09 IST

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे. परळी येथील व्यापारी अमर देशमुख यांच्यावर दिवसा ढवळ्या लाठीकाठीने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला.

dhananjay munde And Pankaja munde
हे खपवून घेतलं जाणार नाही...पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल  |  फोटो सौजन्य: Twitter

बीडः परळी येथील व्यापारी अमर देशमुख यांच्यावर दिवसा ढवळ्या लाठीकाठीने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला.  परळी शहरात येणं मार्केटमध्ये घडलेल्या या फ्री स्टाईल मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  त्यानंतर अशा घटनांमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर या घटनेचा निषेध करत  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे. 

पंकजा मुंडेंनी ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफिया राज  करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग 'गय करणार नाही 'अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीड ला मिळालं हे दुर्दैव..हे खपवून घेतलं जाणार नाही. 

तर दुसऱ्या ट्विट त्यांनी लिहिलं आहे की, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे.

व्यापारी मारहाण प्रकरणी संतापले धनंजय मुंडे 

परळी येथील व्यापारी आणि अन्य काही जणांमध्ये आपसात झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित आरोपींवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा घटनांमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

परळी येथील टॉवर चौक परिसरात काल (दि. १७) रोजी दोन गटात मालमत्तेच्या वादातून भांडण झाले होते, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर भांडणातील आरोपी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, त्यानंतर मुंडेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

परळी येथील व्यापारी, नागरिक सगळेच जण माझे निकटवर्तीय आहेत, जवळचा किंवा दूरचा असे काही नाही. दोघांच्या वादात कुणीही कायदा हातात घेणार असेल तर त्याची गय मी करणार नाही. कोणत्याच परिस्थितीत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिडघडलेली मी खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासनाला तशा सूचना दिल्या असून संबंधित आरोपींवर ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपींना २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे असेही यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.

परळीतील व्यापारी, नागरिक या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी असून प्रत्येकजण माझ्या जवळचेच आहेत. येथील सर्वांशी माझी नाळ थेट जोडलेली आहे, त्यामुळे कुणाचेही वाद हे लोकांना माझ्याशी संबंधित वाटतात. परंतु हे भांडण त्यांच्यातील व्यक्तिगत कारणातून असून संबंधितांवर कडक कारवाई होईल, व्यक्तिगत भांडणांमध्ये माझे नाव जोडून अशा प्रकारची बदनामी करू नये असे आवाहनही मुंडेंनी केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...