100 Crore Recovery Case: देशमुखांवरील आरोपाप्रकरणी पत्राशिवाय दुसरे पुरावेच नाहीत, माजी पोलीस आयुक्तांचं चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 03, 2021 | 22:20 IST

100 Crore Recovery Case:शंभर कोटी वसुली प्रकरणात एक नवीन वळण येण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Former Home Minister Anil Deshmukh) हॉटेल्स, बारमालकांकडून शंभर कोटी वसूल करण्यास सांगत असल्याचा आरोप परमबीर सिंह (Parambir Singh)यांनी केला होता.

Parambir Singh has no other evidence in Deshmukh's allegations
परमबीर सिंह   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चांदिवाल आयोगाने अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीसाठी किंवा त्यांची बाजू आयोगापुढे मांडण्यासाठी उपस्थित राहिलेले नाहीत.
  • परमबीर सिंह यांनी त्यांच्या आरोपासंदर्भात कोणतेही अतिरिक्त पुरावे देण्यात असमर्थता दर्शवली आहे.

100 Crore Recovery Case: मुंबई : शंभर कोटी वसुली प्रकरणात एक नवीन वळण येण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Former Home Minister Anil Deshmukh) हॉटेल्स, बारमालकांकडून शंभर कोटी वसूल करण्यास सांगत असल्याचा आरोप परमबीर सिंह (Parambir Singh)यांनी केला होता. परंतु आता या देशमुख यांच्याविरोधातील 100 कोटींच्या वसुलीचा लेटरबॉम्ब टाकणारे माजी पोलीस आयुक्त (Former Commissioner of Police) परमबीर सिंह यांनी त्या आरोपासंदर्भात आपल्याकडे जास्तीचे पुरावे नसल्याचे या आरोपांचा तपास करणाऱ्या आयोगाला कळवले आहे. यामुळे याप्रकरणात नवी वळण येणार का याकडे लक्ष लागलं आहे. 

दरम्यान परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली. परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अनिल देशमुख अनेक दिवस नॉट रिचेबल राहिले होते. त्यानंतर काल सोमवारी अचानक ते अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यलायात हजर झाले. त्यानंतर ईडीने रात्री उशीरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. देशमुख यांना ईडीच्या कोठडीत पाच नोव्हेंबरपर्यंत रहावे लागणार आहे. वसुली प्रकरणी अनिल देशमुख हेच एक नंबरचे बॉस असल्याचं ईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये नमूद केलं आहे. इतक्यात परमबीर सिंह यांच्या प्रतिज्ञापत्रात नवा खुलासा केला. आपल्या अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात दुसरे पुरावे नाहीत असे म्हटले आहे. 

 परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे चांदिवाल आयोगाकडे ही माहिती नोंदवल्याचे एका वृ्त्तवाहिनीने बातमीत म्हटले आहे. दिलेल्या वृत्तात चांदिवाल आयोगाचे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटरच्या हवाल्याने चांदिवाल आयोगाकडे यापूर्वीच्या सुनावणीतच संबंधित प्रतिज्ञापत्र दिल्याचा दावा करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी सांगितल्याचा दावा केला होता. हे पत्र प्रकाशात आल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदिवाल यांची नियुक्ती केली आहे. चांदिवाल आयोगाने अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीसाठी किंवा त्यांची बाजू आयोगापुढे मांडण्यासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. यासाठी न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाने त्यांना दोन वेळा आर्थिक दंडही सुनावला आहे. पहिल्यांदा गैरहजर राहिल्याबद्धल त्यांना रु. पाच हजार आणि दुसऱ्यांदा गैरहजर राहिल्याबद्धल त्यांना रु. 25 हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. 
याप्रकरणी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असलेले वकील शिशीर हिरे यांनी सांगितलं की परमबीर सिंह यांनी त्यांच्या आरोपासंदर्भात कोणतेही अतिरिक्त पुरावे देण्यात असमर्थता दर्शवली आहे. अॅड. शिशीर हिरे हे चांदिवाल आयोगाचे वकील आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राशिवाय, त्यांच्या आरोपाबाबत त्यांच्याकडे अतिरिक्त तपशील किंवा पुरावे नसल्याचं परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे कळवल्याचं शिशीर हिरे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी परमबीर सिंह कोणत्याही उलट तपासणीसाठीही तयार नसल्याचं हिरे यांनी सांगितलं.  

परमबीर सिंह यांच्याकडे त्यांनी केलेल्या सनसनाटी आरोपासंदर्भात कोणतेही पुरावे नसल्यामुळे, अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच ते ही चांदिवाल आयोगापुढे हजर होतील का असा प्रश्न चर्चिला जात आहे.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या पोलीस कारकिर्दीतील काही जुन्या प्रकरणांविषयीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातीलच दोन गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरन्टही बजावण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी