Sanjay Raut: ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, संजय राऊतांना जामीन

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 09, 2022 | 15:04 IST

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार  संजय राऊत यांना अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, संजय राऊतांना जामीन
ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, संजय राऊतांना जामीन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊतांना दिलासा
  • संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर
  • संजय राऊत लवकरच येणार तुरुंगात बाहेर

Sanjay Raut Bail: मुंबई: पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार  संजय राऊत यांना अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल 102 दिवसानंतर संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राऊतांच्या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) विरोध केला असल्याचं समजतं आहे. त्यामुळे आता ईडी वरील कोर्टात अपील करण्याचीही शक्यता आहे. (patra chawl land scam case mumbais pmla court grants bail to shiv sena leader and mp sanjay raut)

पत्रा चाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पीएमएलए कोर्टाने त्यांना 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. 8 ऑगस्ट 2022 रोजी संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची अनेक तास झडती घेतल्यानंतर ईडीने 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यात त्यांना अटक केली होती. 

अधिक वाचा: Mumbai : ...त्यांचा उद्या आणखी एक घोटाळा बाहेर काढणार, किरीट सोमय्या दादर पोलीस ठाण्यात

राऊतांनी आरोपींना मदत केल्याचा दावा ईडीने केला आहे. फसवणूक केल्याबद्दल आणि त्या बदल्यात त्यांना 1.06 कोटी रुपये देण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. संजय राऊतांचा मित्र आणि मुख्य आरोपी प्रवीण राऊत याने या संपूर्ण घोटाळ्यात 112 कोटींचा रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपीही ईडीने केला होता.

संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने काय केलेला दावा?

आरोप क्रमांक 1

ईडीच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये, कट रचल्यानंतर दोन वर्षांनी प्रवीण राऊतांनी आपल्या खात्यातून 55 लाख रुपये वर्षा राऊत यांना ट्रान्सफर केले होते. ज्या पैशाचा वापर हा मुंबईत फ्लॅट खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला.

आरोप क्रमांक 2

नंतर 2011 मध्ये प्रवीणची फर्म प्रथमेश डेव्हलपर्सने संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीकडून 29.50 लाख रुपयांची गुंतवणूक घेतली. एका महिन्याच्या आत, प्रवीण राऊत यांनी गुंतवणुकीसह अतिरिक्त नफा म्हणून 37.50 लाख रुपये संजय राऊत यांना परत केले. हेच पैसे वापरुन गार्डन कोर्ट परिसरात फ्लॅट खरेदी करण्यात आल्याचा आरोपही ईडीकडून करण्यात आला.

आरोप क्रमांक 3

राऊत यांची पत्नी वर्षा यांना अवनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 5,625 रुपयांच्या गुंतवणुकीसाठी तब्बल 13.95 लाख रुपये मिळाला असल्याचा आरोपही ईडीने केला आहे.

अधिक वाचा: मोठी बातमी ! मविआ नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काढली तर मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

ईडीचं नेमकं म्हणणं काय?

ईडीचा दावा आहे की, त्यांच्याकडे एक जबाब आहे की, जे दर्शवते की शिवसेना नेते संजय राऊत हे देखील या कटाचा भाग होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, 'प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांनी प्रकल्प पूर्ण न करताच प्रकल्पातून पैसे उकळण्याचा कट रचला आणि 672 भाडेकरूंचे भवितव्य धोक्यात आणले. ज्यांची घरे आधीच पाडली गेली आहेत.' 

प्रवीण हा राकेश आणि सारंग वाधवन यांच्यासह गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचा संचालक होता. प्रवीण राऊत हा संजय राऊतचा जवळचा विश्वासू आणि मदतनीस असल्याचा आरोप आर्थिक तपास संस्थेने केला आहे. 

संजय राऊत यांचा फ्रंटमॅन असल्याने त्याचे संजय राऊत यांच्याशी संबंध होते. म्हाडाकडून मंजुरी मिळविण्यासाठी जवळीकीचा वापरही त्याने केला. तसेच इतर लाभ मिळविण्यासाठीही त्याने या जवळकीचा वापर केला. 

अधिक वाचा: Nilesh Rane : 'उद्धव ठाकरेला काड्या घालायची सवय', निलेश राणेची जहरी टीका 

काय आहे पत्रा चाळ प्रकरण

2007 मध्ये, एचडीआयएल (हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) ची सहयोगी कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळच्या पुनर्विकासासाठी म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण) कडून कंत्राट देण्यात आले होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळच्या 672 घरं देण्यात आले होते. यामधून भाडेकरूंसाठी फ्लॅट दिले जाणार होते आणि सुमारे 3,000 फ्लॅट म्हाडाला हस्तांतरित करण्यात येणार होते. ही एकूण जमीन 47 एकर होती आणि उर्वरित जमीन, म्हाडा आणि पत्रा चाळींच्या भाडेकरूंना सदनिका सुपूर्द केल्यानंतर, गुरुआशिष निर्माणला विक्री आणि विकासासाठी परवानगी दिली होती.

गुरू आशिष कंपनीवर आरोप आहे की त्यांनी पत्रा चाळीचे पुर्नविकास करण्याऐवजी ही 47 एकर जमीन वेगवेगळ्या बिल्डरांना विकून टाकली. या व्यवहारातून कंपनीला 1 हजार 34 कोटी रुपये मिळाले. गुरू आशिष कंपनीचे मालक प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपयांचे कर्ज दिले होते असे ईडीच्या तपासात समोर आले होते. 

याच पैश्यांतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये एक फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट इडीने सध्या सील केला आहे. वर्षा राऊत आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या पत्नीने अलिबागमध्ये एक प्लॉट विकत घेतला आहे. या प्लॉटच्या व्यवहरातही पैश्यांचा गैरव्यवहार झाल्याचे इडीने म्हटले आहे. 

फेब्रुवारी 2020 मध्ये, प्रवीणला EOW ने अटक केली होती, तर सारंगला त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. नंतर प्रवीणची जामिनावर सुटका झाली. नंतर पुन्हा ईडीने गुन्हा नोंदवून प्रवीणला या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटक केली आणि त्यानंतर संजय राऊतला एजन्सीने अटक केली होती. मात्र, आता या दोघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी