Central Railway: 10 नाही तर 50 रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट, मुंबईतल्या 'या' रेल्वे स्थानकांवर दर महागला

मुंबई
भरत जाधव
Updated May 09, 2022 | 08:01 IST

सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. गर्दीमुळे आपत्कालीन साखळी ओढण्याचे प्रकार वाढत असल्याने, यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने गर्दीच्या स्थानकातील फलाट तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पुढच्या 15 दिवसांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये इतकं केलं आहे.

Expensive rates at 'this' railway stations in Mumbai, you know?
मुंबईतल्या 'या' रेल्वे स्थानकांवर दर महागला, जाणून घ्या का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोरोनाकाळातही मध्य रेल्वेने फलाट तिकीटाचे दर वाढवले होते. गर्दी ओसरल्यावर काही आठवड्यात हे दर मागे घेऊन फलाट तिकीट पुन्हा दहा रुपये करण्यात आले.
  • 9 मे 2022 ते 23 मे 2022 या 15 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
  • एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंग अर्थात आपात्कालीन साखळी ओढण्याच्या तब्बल 332 घटना घडल्या आहेत.

मुंबई : सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. गर्दीमुळे आपत्कालीन साखळी ओढण्याचे प्रकार वाढत असल्याने, यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने गर्दीच्या स्थानकातील फलाट तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पुढच्या 15 दिवसांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये इतकं केलं आहे.

आज, सोमवारपासूनही दरवाढ लागू होणार असून, 23 मे पर्यंत कायम राहणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. 9 मे 2022 ते 23 मे 2022 या 15 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनेवल स्थानकात फलाट तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले आहे. 

सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंग अर्थात आपात्कालीन साखळी ओढण्याच्या तब्बल 332 घटना घडल्या आहेत. यापैकी फक्त 53 घटना या योग्य कारणासाठी घडल्या आहेत. तर 269 प्रकरणात आरोपींनी कारण नसताना आपात्कालीन साखळी ओढली होती. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्यापैकी बऱ्याच आरोपींची ओळख पटलेली नाही. ते अनोळखी आहेत. त्यामुळे त्यांना पकडणं हे रेल्वे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पकडलेल्या आरोपींकडून 94 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, आपात्कालीन साखळी ओढल्याने रेल्वेच्या वेळांमध्ये बदल झाला. काही लोकल ट्रेन या उशिरा धावल्या. त्यामुळे लाखो नागरिकांचा वेळ वाया गेला. प्रवाशांच्या या गैरसोयीची काळजी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  दरम्यान पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकावरील फलाट तिकीट वाढवण्यात आलेले नाही, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाकाळातही मध्य रेल्वेने फलाट तिकीटाचे दर वाढवले होते. गर्दी ओसरल्यावर काही आठवड्यात हे दर मागे घेऊन फलाट तिकीट पुन्हा दहा रुपये करण्यात आले होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी