PM Narendra Modi Will Inaugurate Various Projects In Mumbai Today : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यात अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. नियमानुसार 5 वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये पुढची निवडणूक होणे अपेक्षित होते. पण कोरोना संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. यानंतर अद्याप निवडणूक झालेली नाही. आता कोरोना संकट नियंत्रणात आले आहे. यामुळे लवकरच निवडणूक आयोग पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभा या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून मुंबईत जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.
वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मुंबईतील ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करतील. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही होणार आहे. एमएमआरडीए मैदानावरच हा कार्यक्रम होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज म्हणजेच गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मेट्रो 2 ए (मेट्रो 2 अ) आणि मेट्रो 7 या 2 मार्गांच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान बीकेसी येथून या कार्यक्रमासाठी येणार आहेत. हा कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील मेट्रो 7 वरील गुंदवली या मेट्रो स्टेशनवर होणार आहे.
मुंबईत वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मेट्रो 1 ही सेवा सुरू आहे. आता मेट्रो 2 ए (मेट्रो 2 अ) आणि मेट्रो 7 हे आणखी 2 मार्ग सुरू होत आहेत. यामुळे मुंबईत मेट्रोचे 3 मार्ग कार्यरत होतील. मेट्रोच्या 3 रूटच्या (Metro Route) कनेक्टिव्हिटीचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मेट्रोमुळे नागरिकांना दहिसरवरून थेट वर्सोवा आणि घाटकोपरपर्यंत तसेच वर्सोवा आणि घाटकोपर येथून थेट दहिसरपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनीच मेट्रो 2 ए (मेट्रो 2 अ) आणि मेट्रो 7 या मार्गांचे 2015 मध्ये भूमिपूजन केले होते. आता पंतप्रधान मोदीच या दोन्ही मार्गांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई 1 मोबाइल अॅप तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) या सेवा सुरू करण्यात येतील.
मुंबईतील सात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. ही 17 हजार 200 कोटी रुपयांची योजना आहे. या योजनेनुसार मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी या ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू केले जातील. या प्रकल्पांची एकूण क्षमता 2460 MLD असेल. पंतप्रधानांच्या हस्ते विसाव्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उद्घाटन केले जाईल. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून विनामूल्य आरोग्य सेवा दिली जाते.
पंतप्रधान मोदी मुंबईत 3 हॉस्पिटलच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ करतील. यात भांडुपचे 360 बेडचे मल्टिस्पेशालिटी म्युनिसिपल हॉस्पिटल, गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगरचे 306 बेडचे हॉस्पिटल आणि ओशिवराचे 152 बेडचे प्रसूती गृह यांचा समावेश आहे.
मुंबईत सुमारे 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी करणार आहेत. हा 6100 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ करणार आहेत. हा 1800 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तसेच पंतप्रधान पीएम स्वनिधी योजनेंतर्गत 1 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कर्ज वाटप करणार आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.