मुंबईकरांनो सांभाळा, पुढील ४८ तासात अति मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई
Updated Sep 18, 2019 | 01:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबई आणि परिसरात येत्या ४८ तासात प्रचंड मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

kokan_rain
मुंबईकरांनो सांभाळा, पुढील ४८ तासात अति मुसळधार पावसाची शक्यता  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुंबई आणि ठाण्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
  • मुंबईत पुढील आठवडाभर पावसाचा मुक्काम
  • मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप सुरु झालेला नाही

मुंबई: यंदा सप्टेंबरपर्यंत महिना सरत आला तरीही पाऊस सतत बरसत आहेत. यंदा पावसाचा मुक्काम बराच लांबला आहे. एवढंच नव्हे तर अजूनही पाऊस मुसळधारच कोसळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा कुलाबा वेधशाळेनं पुढील ४८ तास मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. गेले काही दिवस पावसाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही. त्यातच पुन्हा एकदा वेधशाळेने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने मुंबईकर काही धास्तावले आहेत. 

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर, आणि रायगड, या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच या चारही जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारपर्यंत पाऊस असण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचं जनजीवन सतत विस्कळीत होत आहे. 

 

सप्टेंबर महिन्याच्या साधारण दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. पण यंदा पावसाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा पाऊस आणखी एक आठवडा तरी मुक्कामी असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातील मराठवाडा सोडल्यास जवळपास सर्वच भागांमध्ये यंदा चांगला पाऊस झाला असल्याने बळीराजाही सुखावला आहे. 

यंदा राज्यात दरवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी तर पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षात पाऊस म्हणावा तसा बरसत नव्हता. पण यंदा पावसाने सगळी कसर भरुन काढली आहे. त्यामुळे यंदा अनेक नद्या-नाले भरुन वाहत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक धरणं देखील ओव्हरफ्लो झाली असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. 

यंदा मुंबईसह कोकण, प. महाराष्ट्र, विदर्भ येथे पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे या सगळ्याच भागातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुसरीकडे गोदावरी नदी तुंडुंब भरुन वाहत असल्याने औरंगाबादमधील जायकवाडी धरण देखील १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी