मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती : महाराष्ट्र एटीएसला प्रदिप शर्मांचा संशय, शर्मा - वाझे २ मार्चला भेटले

मुंबई
Updated Apr 08, 2021 | 18:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी आणि एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे यांची २ मार्चला भेट. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) आता महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या नव्या माहितीनुसार तपास करते आहे.

Maharashtra ATS suspects Pradeep Sharma
मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा संशयाच्या भोवऱ्यात 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्र एटीएसला हिरेन मृत्यू प्रकरणात प्रदीप शर्मांच्या सहभागाचा संशय
  • प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची २ मार्चला झाली भेट
  • एनआयएचा महाराष्ट्र एटीएसकडून मिळालेल्या माहितीवर तपास सुरू

नवी दिल्ली : सचिन वाझे यांच्यासंदर्भातील तपास आता मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी आणि एनकाऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांच्यापर्यत पोचला आहे. महाराष्ट्र 'एटीएस'ला (अॅंटी टेररिस्ट स्क्वॉड) प्रदीप शर्मा यांचा या प्रकरणातील सहभागाचा संशय वाटत असल्यामुळे या प्रकरणाचा विस्तार आता प्रदीप शर्मा यांच्यापर्यत झाला आहे. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) आता महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या नव्या माहितीनुसार तपास करते आहे.

सूत्रांकडून टाईम्स नाऊला मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांची सचिन वाझेंशी २ मार्चला भेट झाली होती. शर्मा हे सलग दुसऱ्या दिवशी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनिशी सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएसमोर चौकशीसाठी हजर झाल्याने या नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचाही एनआयएकडून तपास केला जातो आहे.

प्रदीप शर्मा २०१९ मध्ये शिवसेनेत दाखल


प्रदीप शर्मा एनआयएसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते. ते एनआयएच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात एक वाजेच्या सुमारास आले होते. बुधवारी प्रदीप शर्मा यांची जवळपास सात तास चौकशी झाली होती. 

प्रदीप शर्मा हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांचे विश्वासू सहकारी होते. परम बीर सिंह ठाणे पोलिस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे अॅंटी एक्सटॉर्शन विभागाचे प्रमुखपद होते. हा विभाग क्राईम ब्रॅंचच्या अखत्यारित येतो. प्रदीप शर्मा यांनी नंतरच्या काळात स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. 


दरम्यान शर्मा सप्टेंबर २०१९ मध्ये शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. 

वाझे यांच्या पत्राने खळबळ


सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडून २ कोटी रुपयांची मागणी केल्याचे म्हटले होते. वाझे यांना मुंबई पोलिस दलात सामावून घेण्याच्यासंदर्भात ही मागणी करण्यात आली होती असा आरोप वाझे यांनी केला होता. तर आणखी एक मंत्री अनिल परब यांनी वाझे यांना ही रक्कम कंत्राटदारांकडून वसूल करण्यास सांगितले होते, असे वाझे यांनी या पत्रात म्हटले आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

वाझे यांच्या पत्रात प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठीचा हा एक राजकीय कट आहे. 'पहिल्या दिवसापासूनच महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. ज्यांना सरकार पाडायचे आहे त्यांचे चेहरे लोकांसमोर येत आहेत. जे लोक तुरुंगात आहेत ते पत्र लिहितात अशी एक नवीनच कार्यशैली समोर येते आहे. तुरुंगातील लोक पत्र लिहितात आणि त्या पत्रांनाच मग पुरावा समजले जाते. हे हीन दर्जाचे राजकारण आहे', अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी