प्रताप सरनाईक हे काही साधू-संत नाहीत: नारायण राणे 

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 24, 2020 | 17:03 IST

प्रताप सरनाईक हे काही साधू-संत नाहीत. अशा शब्दात नारायण राणे यांनी सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर टाकण्यात आलेल्या ईडीच्या छाप्यांबाबत वक्तव्य केलं आहे. 

Narayan rane
प्रताप सरनाईक हे काही साधू-संत नाहीत: नारायण राणे  

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (shiv sena mla pratap sarnaik)  यांच्या घरी आणि कार्यालयासह एकूण १० ठिकाणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी)च्या टीमने आज (२४ नोव्हेंबर) सकाळी छापे टाकले. (raided by officials of enforcement directorate) प्रताप सरनाईक हे सध्या परदेशात असून त्यांचा पुत्र विहंग सरनाईक याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान, ईडीच्या या धाड सत्रानंतर आता राजकीय शेरेबाजी सुरु झाली आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत.' असं म्हणत राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले: 
 
'कायदेशीर गोष्टी असतात त्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते. पण प्रताप सरनाईक हे काही साधू-संत नाहीत. त्यामुळे ईडीची कारवाई पूर्ण होऊ द्या मग त्यावर सविस्तर बोलेन. सीबीआय, ईडी या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे आता ईडीची छापा योग्य आहे की अयोग्य हे तुम्ही माध्यमांनी दाखवावं. त्यानंतर मी सविस्तर प्रतिक्रिया देईन.' असं राणे यावेळी म्हणाले. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व कार्यालयावर ईडीने (ED) टाकलेल्या छाप्यांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'कुणीतरी तक्रार केल्याशिवाय किंवा काहीतरी मटेरियल असल्याशिवाय ईडी कोणावरही धाड टाकत नाही. ईडीकडे नक्कीच काहीतरी पुरावे असतील,' असं फडणवीस म्हणाले. 

पदवीधर आणि  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं सोलापूरमध्ये आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सरनाईक यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, 'या संपूर्ण घडामोडींचा तपशील माझ्याकडं नाही. त्यामुळं मी त्यावर फारसं काही बोलणार नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही. त्यांनी तशी कारवाई केली असेल तर नक्कीच त्यांच्याकडे काही तक्रारी किंवा मटेरियल असेल.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी