मुंबई: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या (NDA)च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा देणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं आहे. याबाबतचे संकेत स्वत: संजय राऊत यांनी आज (१२ जुलै) माध्यमांशी बोलताना दिले आहेत. खासदारांचा वाढता दबाव लक्षात घेता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
याविषयीचा निर्णय उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसात जाहीर करतील असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. याच वेळी संजय राऊत असंही म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही. तसंच उद्धव ठाकरे कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. त्यांनी सगळ्या खासदारांची मतं ऐकून घेतली आहेत. त्यामुळे आता ते याबाबत निर्णय जाहीर करतील. असं संजय राऊत म्हणाले. मात्र, यावरुन एक गोष्ट जवळजवळ निश्चित झाली आहे की, खासदारांच्या दबावामुळे अखेर उद्धव ठाकरे हे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या निर्णयाप्रत पोहचले आहेत.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांचं मत जाणून घ्यायचे. आताच्या पक्षप्रमुखांनीही देखील खासदारांची भूमिका जाणून घेतली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. द्रोपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे. शिवसेनेतही आदिवासी समाजाचे नेते मोठ्या प्रमाणात आहेत.'
'काल निर्मला गावित, आमशा पाडवी, शिवाजीराव ढवळे हे आमचे नेते बैठकीला हजर होते. उद्धव ठाकरेंनी प्रत्येकाचं मत समजून घेतलं आहे. या सर्वांनी उद्धव ठाकरेंवर निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. पण याचा अर्थ असा होत नाह की, द्रोपदी मुर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे आम्ही भाजपला पाठिंबा दिला.'
अधिक वाचा: "काम असेल तर फोन लावायला सांगतो, कॅमेरा सुरू करायला नाही" मुख्यमंत्री शिंदेंच्या व्हिडिओवरुन अजितदादांचा टोला
'यशवंत सिन्हा हे यूपीएचे उमेदवार आहेत. त्यांनाही सद्भावना आहेत. विरोधकांचं ऐक्य टिकलं पाहिजे हे खरं असलं तरी अशा निवडणुकांमध्ये लोकभावना पाहिल्या पाहिजे. यापूर्वी देखील आम्ही प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. तेव्हा आम्ही एनडीएमध्ये होतो. तसंच प्रणव मुखर्जींना देखील पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची परंपरा आहे.'
अधिक वाचा: 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार'
'यामुळे याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे जाहीर करतील. आज किंवा उद्या ते निर्णय जाहीर करतील. पक्षप्रमुख हे दबावाखाली निर्णय घेत नाहीत. त्यांचा निर्णय पक्षातील सर्व आमदार-खासदारांना बंधनकारक असतो.'
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.