दोन चव्हाणांवरून रखडला काँग्रेसचा निर्णय, हे चव्हाण होणार प्रदेशाध्यक्ष? 

मुंबई
पूजा विचारे
Updated Dec 24, 2019 | 11:06 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेश काँग्रेसची जबाबदारी द्यावी आणि अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घेतला आहे. 

ashok chavan and prithviraj chavan
दोन चव्हाणांवरून रखडला काँग्रेसचा निर्णय, हे चव्हाण प्रदेशाध्यक्ष?  

थोडं पण कामाचं

  • राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.
  • काँग्रेसच्या यादीला दिल्लीतून हिरवा झेंडा मिळाला नसल्यानं विस्तार लांबणीवर पडला आहे.
  • दोन चव्हाणांसाठी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी रखडली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप कोणाला मंत्री करायचे यावरून काँग्रेसचा निर्णय होत नसल्यानं बुधवारी होणारा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. काँग्रेसच्या यादीला दिल्लीतून हिरवा झेंडा मिळाला नसल्यानं विस्तार लांबणीवर पडला आहे. काँग्रेसच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन चव्हाणांसाठी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी रखडली आहे. त्यातील पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेश काँग्रेसची जबाबदारी द्यावी आणि अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घेतला आहे. 

काँग्रेसमधून कोणाला मंत्रीपद द्यायचे याची नावे ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत गेले होते. सोमवारी यादी फायनल करून येतो, मंगळवारी शपथविधी करू असे थोरात यांनी सांगितलं होतं. मात्र अद्यापही काँग्रेसची नावं अंतिम झाली नाही आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार आहे. 

पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही यावरून खलबतं चालू आहेत. त्यातूनच मार्ग काढत अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा एक प्रस्ताव सोमवारी समोर आला. काँग्रेसमध्ये दोन चव्हाणांसह डझनभर नेत्यांनी मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे. पण या दोघांच्याही नावाला पक्षातल्या युवा ब्रिगेडचा विरोध असल्याचं समजतं आहे. 

यापूर्वी मंत्री राहिलेल्यांना आता मंत्री करू नका अशी मागणी तरूण आमदारांनी केली आहे. यावेळी तरूण चेहऱ्यांना संधी द्यावी अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करण्यात आली आहे. 

 

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्र विकासआघाडीचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनानंतर २४ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. काँग्रेसमध्ये मंत्रिपदाची नावे आणि खात्यांसाठीही लॉबिंग सुरू आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात आठ ते नऊ चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीचे ११, तर शिवसेनेचे १२ ते १३ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यात काँग्रेस ७ ते ८ सदस्य राहण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी