पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट, 2014 ला शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा प्रस्ताव होता पण...

मुंबई
पूजा विचारे
Updated Jan 20, 2020 | 12:33 IST

 2014 मध्येही शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसनं नकार देत तो प्रस्ताव फेटाळला, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

prithviraj chavan
पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट, 2014 ला शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा प्रस्ताव होता पण...  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: 2014 मध्येही शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसनं नकार देत तो प्रस्ताव फेटाळला, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेनं हा प्रस्ताव दिल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 

यासोबतच त्यांनी सध्याच्या सरकारबद्दलही वक्तव्य केलं. राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नसल्याचं ते म्हणालेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. आता सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. 

पीटीआयकडून पृथ्वीराज चव्हाण यांना मुलाखतीत विचारलं की, वेगळी विचारधारा असूनही  काँग्रेस आणि शिवसेना एकत्र कसे आले. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2014 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अशीच परिस्थिती होती.

त्यावेळी सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माझ्याशी संपर्क करून आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा मी तातडीने ती ऑफर नाकारली आणि राजकारणात जय-पराजय ही सामान्य गोष्ट असल्याचं म्हटलं होतं. मी तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी काँग्रेस निवडणुकीत पराभूत झाला होता. त्यामुळे आम्ही विरोधात बसणार हे निश्चित होतं, असं ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीसांवर आरोप

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपकडून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या 40 आमदारांना धमकीचे आणि आमिषाचे फोन येऊ लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुमारे 40 आमदार फोडले, सत्तेचा गैरवापर केला गेला. एकूणच भाजपनं लोकशाही संपवली असती, असंही ते म्हणाले. 

त्यावेळीची एकंदर परिस्थिती पाहता शिवसेना आणि भाजप यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला. सुरूवातीला या प्रस्तावाला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहमत नव्हत्या. मात्र, अनेक चर्चांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान हे सध्याचं आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल का, याबद्दलही विचारलं. त्यावर ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारबाबत 100 टक्के हमी कोणीच देऊ शकत नाही. तसंच समजूतदारपणानं काम केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यातच रोजच्या कामकाजात थोड्याफार अडचणी येतील, असंही त्यांनी मान्य केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी