परदेशात जाऊन मोदी देश तोडण्याची भाषा करतात: राहुल गांधी

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 13, 2019 | 20:31 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांची चांदिवलीमध्ये सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.

Rahul Gandhi
परदेशात जाऊन मोदी देश तोडण्याची भाषा करतात: राहुल गांधी   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांची चांदिवलीमध्ये सभा पार पडली.
  • राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.
  • राहुल गांधी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांची चांदिवलीमध्ये सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात दौऱ्यावर जातात, तेव्हा देश तोडण्याची भाषा करतात, असं राहुल गांधींनी म्हटलंय. या सभेत राहुल गांधींनी नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, जीएसटी वरून राहुल गांधी चांदिवलीतल्या प्रचारसभेत मोदींना लक्ष्य केलं. 

मोदी सरकारच्या धोरणांमुळे जागतिक स्तरावरील उद्योजकांनी भारताकडे पाठ फिरवली असल्याचं देखील राहुल गांधींनी म्हटलंय. सामान्यांचा पैसा लुटून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारख्या उद्योगपतींच्या घशात घातला म्हणत जीएसटीमुळे कोणाला फायदा झाला ते पंतप्रधान मोदींनी सांगावं असा सवाल राहुल गांधींनी विचारला. मोदी सरकारनं गब्बर सिंग टॅक्स लावून जनतेचं कंबरडं मोडलं. काळा पैसा नष्ट करायचा असल्याचं सांगून मोदींनी नोटाबंदी केली. नोटा बदलण्यासाठी मुंबईकर रांगेत उभे होते. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा होता. ते देशाबाहेर पळून गेले. आज लहान उद्योगधंदे बंद होत असून धारावीतील उद्योग संकटात आलेत आणि याला सर्वस्वी मोदी जबाबदार असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. 

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकांना खूप आश्वासनं दिली होती. मात्र सध्याची स्थिती परिस्थिती पाहिल्यास अत्यंत बिकट असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. मेड इन इंडिया बोलणाऱ्या मोदींचं प्रत्यक्षात मेड इन चायना सुरू असल्याचं म्हणत देशासमोरच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी नरेंद्र मोदी कधी चंद्राविषयी बोलतात कधी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला जातात असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. 

मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काहीच बोलत नाही. बँक घोटाळे होतात. मात्र त्यावरही भाष्य करत नाहीत. लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजप सरकारकडून सुरू आहे. देशात असलेल्या युवा पिढीला त्यांचं भविष्य दिसत नाही. पण दुसरीकडे मोदी देश फिरण्यात व्यस्त आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी