महाराष्ट्रात पावसाचे ९० बळी, मागील २४ तासांत ८ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 14, 2022 | 10:06 IST

Rain toll crosses 90 in Maharashtra with 8 more deaths; many highways hit : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी (२०२२) पावसामुळे आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला. या ९० पैकी ८ जणांचा मृत्यू मागील २४ तासांमध्ये झाला. 

Rain toll crosses 90 in Maharashtra with 8 more deaths; many highways hit
महाराष्ट्रात पावसाचे ९० बळी, मागील २४ तासांत ८ मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात पावसाचे ९० बळी, मागील २४ तासांत ८ मृत्यू
  • महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या
  • राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

Rain toll crosses 90 in Maharashtra with 8 more deaths; many highways hit : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी (२०२२) पावसामुळे आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला. या ९० पैकी ८ जणांचा मृत्यू मागील २४ तासांमध्ये झाला. । महाराष्ट्र । पाऊस

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. कल्याण खाडी परिसरात २०० घरांमध्ये आणि परिसरातील गोठ्यांमध्ये पाणी शिरले. अखेर नागरिकांना आणि  सुमारे तीन हजार गुरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. 

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सखल भागांमधून तसेच नदी किनाऱ्याचा परिसर, खाडी परिसर येथून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सखल भागांतून आठ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. 

वसई येथे जमीन खचल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले. रायगड जिल्ह्यात बांधकाम कोसळून एक मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात एक ४५ वर्षांची व्यक्ती वाहून गेली. नागपूरमधील सावनेर तालुक्यात पाण्यात वाहून गेलेल्या कारमधील सहा पैकी चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. नद्यांमधील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. हा संपर्क सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. स्थानिक पातळीवर समन्वय साधून आवश्यकतेनुसार मदत दिली जात आहे. राज्यात १६ ठिकाणी मदतकार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची आवश्यतेनुसार नियुक्ती केली आहे.

पावसामुळे स्थलांतरित केलेल्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिल्या आहेत. मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे जमीन खचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोलमडली होती. एक मार्गिका तब्बल नऊ तास बंद होती. अखेर परिस्थिती सुरळीत करून मार्गिका पुन्हा सुरू करण्यात आली.

मुरबाडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कल्याण - अहमदनगर महामार्गावर किशोर गावाजवळ वाहतूक कोलमडली. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आणि ३५ जणांना घेऊन निघालेली बस एका नाल्यात अडकली होती. पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून सर्व प्रवाशांना वाचवले. 

नांदेड जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये १२३ मिमि पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पंचगंगा धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अर्ध्यापेक्षा जास्त भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी