राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 21, 2021 | 10:49 IST

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पाऊस जोर धरणार आहे.

Red rain alert for five districts
पाच जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी
  • रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार अति मुसळधार पावसाचा इशारा
  • मुंबई केंद्राच्या म्हणण्यानुसार पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पाऊस जोर धरणार आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी मंगळवारी भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडेल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीच्या मुंबई केंद्राच्या म्हणण्यानुसार पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजापूर शहरातील पूर ओसरला असून कोदवली नदी पुन्हा पूर्वपदावर आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. राजापूर कोदवली नदी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे राजापूर शहराला पुराचा विळखा पडला होता. बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. तब्बल सहा तास बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी होते. मात्र रात्री पावसाने मध्यरात्रीपासून थोडीशी उसंत घेतल्यामुळे राजापूर शहरातील पूर सरला आहे. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यातच आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी