राज कुंद्राला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 23, 2021 | 19:13 IST

पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा याला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

Raj Kundra sent to police custody till 27th July 2021
राज कुंद्राला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी 

थोडं पण कामाचं

  • राज कुंद्राला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी राज कुंद्रासह ११ अटकेत
  • पॉर्न फिल्मच्या पैशांतून चालत होते बेटिंग

मुंबईः पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा याला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला. याआधी राज कुंद्रा याला सोमवारी १९ जुलै रोजी रात्री उशिरा अटक झाली आणि मंगळवारी २० जुलै रोजी कोर्टात सादर करण्यात आले होते. पोलिसांना चौकशी करता यावी म्हणून कोर्टाने राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज (शुक्रवार २३ जुलै २०२१) पोलीस कोठडीची मुदत संपण्याच्या सुमारास पोलिसांनी पुन्हा राज कुंद्राला कोर्टात हजर केले. यावेळी कोर्टाने राज कुंद्रा याला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. Raj Kundra sent to police custody till 27th July 2021

पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचचे एक पथक राज कुंद्राला घेऊन त्याच्या मुंबईतील घरी पोहोचले. घरात बंद दाराआड राज कुंद्रा आणि घरातील इतर सदस्य यांची समोरासमोर बसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी घरातून काही माहिती गोळा केली जाण्याची शक्यता आहे. सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तपासाचा भाग म्हणून राज कुंद्रा याला त्याच्या घरी नेले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पोलीस तपास सुरू असतानाच राज कुंद्रा याच्या वकिलाने मुंबईच्या हायकोर्टात याचिका केली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर आणि त्याआधारे पुढे झालेली कारवाई बेकायदा असल्याचा दावा राज कुंद्रा याच्या वकिलाने केला आहे. 

पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी राज कुंद्रासह ११ अटकेत

पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी राज कुंद्रासह ११ जणांना मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अटक केली आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे. अटकेतील ११ जणांपैकी राज कुंद्रा आणि रेयान थोरपे हे दोघे २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत असतील.

कुंद्राच्या सर्व्हरवरील २ टीबी डेटा डीलीट

राज कुंद्राच्या वियान कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्म निर्मिती सुरू होती. दररोज पॉर्न फिल्म निर्मितीशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी नवा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला जात होता. या ग्रुपमध्ये समाविष्ट केलेल्या व्यक्तींशी कामाबाबत चर्चा व्हायची. कंपनीच्या सर्व्हरवर डिजिटल स्वरुपात फोटो, व्हिडीओ होते. यापैकी दोन टीबी डेटा राज कुंद्रा याच्या आदेशावरुन डीलीट करण्यात आला होता. ही घटना याच वर्षी काही महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.

पॉर्न फिल्मच्या पैशांतून चालत होते बेटिंग

पॉर्न फिल्म निर्मितीमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पैसे मिळत होते. या उत्पन्नामधून खेळांचे बेटिंग (सट्टेबाजी) करण्यासाठी राज कुंद्रा पैसा वापरत होता; असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा १२१ पॉर्न व्हिडीओ एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार करुन विकणार होता. या व्यवहारात १२ लाख डॉलरचे उत्पन्न होण्याची शक्यता होती. हा पैसा पण खेळांचे बेटिंग (सट्टेबाजी) करण्यासाठी वापरला जाणार होता पण त्याआधीच अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चौकशीसाठी वेळ हवा असल्याचे कारण पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करताना पोलिसांकडून देण्यात आले. पोलिसांनी राज कुंद्राच्या बँक खात्यांमधील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी वेळ हवा असल्याचेही कोर्टाला सांगितले. कोर्टाने पोलिसांच्या म्हणण्याची दखल घेत राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी