Raj Thackeray press conference at 6 PM today : मुंबई : मशिदींवरील भोंगे बंद होणार नसतील तर हनुमान चालिसा लावणार अशी आक्रमक भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आज (बुधवार ४ मे २०२२) संध्याकाळी सहा वाजता मुंबईत शिवतीर्थ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. याआधी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाला मंगळवार ३ मे २०२२ पर्यंत राज्यातील भोंगे हटवा नाही तर ४ मे पासून परिणाम भोगायला तयार राहा, अशा स्वरुपाचा जाहीर इशारा दिला होता. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या वातावरणात राज ठाकरे संध्याकाळी काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पहाटे होणाऱ्या अजानसाठी भोंग्यांचा वापर झाला नाही. तर राज्यातील काही भागांमध्ये नियमांचे पालन करून भोंग्यांचा वापर अजानसाठी सुरू आहे. मनसेने पुण्यासह राज्यात काही ठिकाणी हनुमान मंदिरात घंटानाद करत आरती केली. मनसेचा पवित्रा पाहून सतर्क झालेल्या पोलिसांनी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे संध्याकाळी सहा वाजता मुंबईत शिवतीर्थ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
मुंबई पोलिसांनी राज ठाकरेंना मंगळवार ३ मे २०२२ रोजी १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या नोटीसवर राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलण्याची शक्यता आहे. तसेच भोंग्यांच्या मुद्यावर मनसे पुढे काय करणार याबाबतही राज ठाकरे पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.