Raj Thackeray : मुंबई : नुकतंच मुंबई आणि पुण्यात राज ठाकरे यांची सभा झाली. मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला आहे. असे असले तरी भाजपने राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. आता ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज यांच्या सभेतनंतर भाजपसोबत मनसेची युती होणार का अशी चर्चा होत होती. आगामी सभेत राज यावर काही बोलणार का याची उत्सुकता लागली आहे.
९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यात मनसेचा कार्यकर्ता मेळावा झाला होता. तेव्हा झालेल्या भाषणात हा फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर मुंबईत गुढीपाडव्याला असेल असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार गुढीपाडव्याला दादरच्या शिवाजी महाराज पार्कात मनसेचा मेळावा पार पाडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. शिवसेनेची भाजपसोबत युती झाली असताना शिवसेने दगा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली असा आरोप त्यांनी केला. तसेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जातीयवाद वाढला, शरद पवार यांना जातीयवादाचे राजकारण हवे असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच राज्यातील मदरशांची एकदा तपासणी करा आणि मशीदीवरील भोंगे हटवा अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपर आणि कांदिवलीत मशीदीसमोर हनुमान चालीसा लावली होती. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता.
सभे नंतर दुसर्या दिवशी केंद्रीय मंत्री आणि नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हा भाजप मनसे युती होणार का या चर्चांना उधाण आले होते. परंतु राज ठाकरे आणि आपली भेट ही वैयक्तिक होती आणि या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले होते.
आता शनिवारी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत मशीदीवरील भोग्यांवरून जो वाद निर्माण झाला आहे त्यावर राज ठाकरे काय बोलणार तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युती होणार का यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.