पुण्यात नाही तर उद्या मुंबईत होणार 'राज'गर्जना, या ठिकाणी होणार सभा

मुंबई
Updated Oct 09, 2019 | 21:52 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा नारळ फोडणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे राज ठाकरेंची सभा रद्द झाली. पण आता मनसेच्या प्रचाराचा मुहूर्त निश्चित झाला आहे. 

Raj Thackeray
पुण्यात नाही तर उद्या मुंबईत होणार 'राज'गर्जना, या ठिकाणी होणार सभा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राज ठाकरे यांची आज मुसळधार पावसामुळे प्रचारसभा रद्द करण्यात आली.
  • पुण्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यानं ही सभा रद्द करावी लागली.
  • पुण्यात नाही तर मुंबईत राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुसळधार पावसामुळे प्रचारसभा रद्द करण्यात आली. पुण्यात या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पुण्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यानं ही सभा रद्द करावी लागली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे पुण्यात आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण आधीपासूनच या सभेवर पावसाचं सावट होतं. पण आता पुण्यात नाही तर मुंबईत राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या दोन सभा मुंबईत होणार आहेत. अखेर उद्या मनसे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडणार आहे. उद्या मुंबईत राज ठाकरे यांच्या दोन सभा आयोजित करण्यात आल्यात. पहिली सभा उद्या संध्याकाळी ६ वाजता, मराठा कॉलनी, पटेल नगर, सांताक्रुझ येथे आयोजित केली आहेत. तर उद्याच ८ वाजता, आझाद मैदान, एम.जी. रोड, गोरेगाव येथे दुसरी सभा होईल. मनसेनं ट्विटरवर या संदर्भातली माहिती दिली आहे. 

पुण्यात सभा होण्याआधी पावसानं हजेरी लावली.  सरस्वती शाळेच्या मैदानावरुन राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार होता.  सभेच्या ठिकाणी मुसळधार होत असल्यानं मनसेनं ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.  काल रात्री पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मैदानावर चिखल आणि पाणी साचलं होतं. त्यानंतर सभेवर पावसाचं सावट असल्याचं बोललं गेलं. तरीही सुद्धा मनसेचे नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर मैदानावर साफसफाईचं काम केलं. तरीही मुसळधार पावसानं खूप नुकसान झालं. आताच्या पावसामुळे मैदानात चिखल आहे. मैदानातील खुर्च्यांही पाण्यात गेल्यात. पावसामुळे सभेसाठी उभारलेलं स्टेज, लाईट्स, साऊंड सिस्टमचंही नुकसान झालं आहे. मैदानावर चिखल झाल्यानं तसंच पाणी साठल्यानं कार्यकर्त्यांनी मैदानावर खडी, मोठमोठे प्लास्टिक टाकून मैदान व्यवस्थित करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतू संध्याकाळी पुन्हा पावसानं हजेरी लावली.

दरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या आणखीन दोन सभा पुण्यात नियोजित करण्यात आल्या आहेत. त्यातच आणखीन एक सभा घेण्याची विनंती राज ठाकरेंना करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.ज्यामुळे आज रद्द झालेल्या सभेची भरपाई करून घेता येईल.

मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. पण त्यावेळी राज ठाकरेंनी भाजपविरोधात संपूर्ण राज्यात प्रचार केला होता. यासाठी अनेक सभा देखील होत्या. त्यावेळी राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा फॉर्म्युला खूपच हिट झाला होता. पण प्रत्यक्ष मतदानात त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचं दिसून आलं होतं. पण राज ठाकरेंच्या भाषणाप्रमाणेच त्यांच्या या फॉर्म्युलाची खूपच चर्चा झाली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आता प्रचारात कोणती नवी क्लुप्ती शोधून काढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...