मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2022) उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) कर्नाटकमधून उमेदवार असतील, माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेची महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती, मात्र, तिसऱ्या जागेसाठी अजूनही सस्पेन्स कायम आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार निश्चित केल्यामुळे भाजपने आता आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपकडून पियूष गोयल यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेरीस त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यापाठोपाठ अनिल बोंडे यांनाही संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, तिसऱ्या जागेसाठीही भाजपने हालचाल सुरू केली होती. विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त 13 मतांची गरज आहे.
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.
दरम्यान, भाजपने मध्य प्रदेशातून कविता पाटीदार, राजस्थानमधून घनश्याम तिवारी, लक्ष्मीकांत बाजपेयी, राधामोहन अग्रवाल, सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय भाजपने उत्तराखंडमधून कल्पना सैनी, बिहारमधून सतीशचंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल, हरियाणातून कृष्णलाल पनवार यांना उमेदवारी दिली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.