Rajyasabha Elections 2022, Maharashtra, out of 6 seats BJP won 3 Shivsena 1 NCP 1 Congress 1 : मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात विरोधात असलेल्या भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. या उलट सत्ताधारी शिवसेनेच्या दोन पैकी एका उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेचे संजय पवार निवडणुकीत हरले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार महाराष्ट्रात भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि अनिल बोंडे या दोघांना प्रत्येकी ४८ तर धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. काँग्रेसच्या इमरान प्रतापगढी यांना ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली.शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. सेनेचे संजय पवार फक्त ३३ मते मिळवू शकले.
राज्यसभा निवडणूक, महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
मतदानानंतर भाजपने तीन मतांवर आक्षेप घेतला. यापैकी शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत रद्द करण्यात आले. यासाठी नियमाचे उल्लंघन केल्याचे कारण देण्यात आले. तर काँग्रेसच्या यशोमती ठाकुर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड या दोघांची मते वैध ठरविण्यात आली. महाविकास आघाडीचे आक्षेप फेटाळण्यात आले.
राज्यसभेच्या ११ राज्यांतील ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यापैकी ४१ जागांवर बिनविरोध निवड झाली. उर्वरित १६ जागांसाठी शुक्रवार १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान झाले. नंतर मतमोजणी झाली. यात भाजपच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रत्येकी ३ तर राजस्थानमधील एका उमेदवाराचा विजय झाला. हरयाणात भाजपच्या तिकिटावर एक उमेदवार विजयी झाला आणि भाजपचे समर्थन असलेला एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. यामुळे १६ पैकी ९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे राजस्थानमध्ये तीन तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक असे पाच उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा महाराष्ट्रात विजय झाला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.