राष्ट्रवादीला आणखीन एक धक्का देण्याची भाजपची तयारी, 'हा' दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

मुंबई
Updated Aug 19, 2019 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपत प्रवेश केला असताना आता आणखीन एक नेता भाजपच्या वाटेवर आहे

NCP, BJP flags
राष्ट्रवादी काँग्रेसचा 'हा' दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर 

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप देणार राष्ट्रवादीला मोठा धक्का
  • विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
  • शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आता रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर

मुंबई: भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीला काही दिवसच झाले असताना आता भाजप पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रामराजे निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसेल.

राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून कमळ हाती घेणार?

रामराजे निंबाळकर हे विधानपरिषदेचे सभापती आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. तसेच रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांचे खूप जवळचे संबंध आहेत. मात्र, आता हेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत असलेल्या वादामुळेच रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे.

उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात वाद

रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहेत. त्यांचा राजघराण्याशी संबंध आहे. तर, उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. मात्र, उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद आहे. एकाच पक्षात असले तरी त्यांच्यात वाद होत असतात. रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतरही त्यांना विधानपरिषदेच्या सभापती पदावर कायम ठेवण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे.

रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वादात खुद्द शरद पवार यांनी म्ध्यस्थी केली होती मात्र, तरीही त्याचा काही परिणाम झाला नसल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर या दोघांनीही एकमेकांविरोधात उघडपणे भाष्य केलं होतं. 

'या' मतदारसंघांची केली मागणी?

रामराजे निंबाळकर यांनी भाजपत प्रवेश करण्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तीन मतदारसंघांची मागणी केली असल्याचं वृत्त आहे. या तीन मतदारसंघांमध्ये मुंबईतील कुलाबा मतदारसंघ, साताऱ्यातील फलटण आणि वाई या मतदारसंघांचा समावेश आहे. कुलाबा हा मतदारसंघ त्यांनी आपले जावई राहुल नार्वेकर यांच्यासाठी मागितला असल्याचं बोललं जात आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार

काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांचे भाऊ शिवेंद्रराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आता रामराजे निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर आहेत. रामराजे निंबाळकर यांनी भाजपत प्रवेश केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातारा जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एक मोठा फटका बसेल यात शंका नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...