मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इरादा जाहीर केलेले अमरावतीचे राणा दाम्पत्याला काल खार पोलिसांनी अटक केली. दाम्पत्याला थांबविण्यासाठी शिवसैनिकांनी राडा केला होता. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी आता सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये हलवले आहे. राणा दाम्पत्याने चिथावणीखोर वक्तव्याचा केल्याचा आरोप करत काल पोलिसांनी त्यांना खार येथील निवासस्थानातून अटक केली होती. रात्री खार पोलीस स्टेशनमध्येच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
राणांचा जामीन घेण्यास नकार
मुंबई पोलिसांनी आपल्याला बेकायदा अटक केली आहे. त्यामुळे जामीन घेण्यास राणा दाम्पत्याने नकार दिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी आज सकाळी दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्यांना आज वांद्रे सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, यावेळी राणा दाम्पत्य जामीन मागणार नसल्यामुळे पोलिस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राणा दाम्पत्याची घोषणा ठरली निव्वळ स्टंटबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राणा दाम्पत्याची घोषणा ही नुसतीच स्टंटबाजी ठरली. अखेर शनिवारी सायंकाळी खासदार नवनीत कौर-राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्याचा आरोप ठेवून भादंवि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
उस्मानाबादेतही राणांविरोधात शिवसैनिकांनी तक्रार दिली आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.