मुंबई : कितीही विरोध झाला तरी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी चालिसा पठन केल्यानं राज्याला काय फायदा होणार याचा पाढा वाचला. आमदार रवी राणा यांनी म्हटले की, मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे. बेरोजगारी वाढली आहे. विकास थांबला आहे. त्यामुळे विघ्न दूर करण्यासाठी चालिसा म्हणणं आवश्यक असल्याचं राणा म्हणालेत.
महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने संकटं सुरु आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भात येत नाहीत. विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जात नाहीत. शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची मदत करत नाहीत. मंत्रालयात दोन-दोन वर्ष जात नाहीत. कुठेतरी ज्या पद्धतीने विकास थांबलेला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे, विकास थांबलेला आहे, औद्योगिस विकास थांबलेला आहे, बेरोजगारी वाढत आहे. या उद्देशाने या संकटातून मुक्त होण्यासाठी हनुमान चालिसा म्हटलं पाहिजे.
ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदुंच्या नावाने त्या ठिकाणी हनुमान चालिसाला विरोध होत असेल तर मला असं वाटतं, की उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते दुसऱ्याच दिशेला जाऊन या महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. अशी टीका रवी राणा यांनी केली आहे. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही असेही रवी राणा यांनी म्हटले. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटले.
सत्तेवर असलेली शिवसेना भाजपच्या भरवशावरच आहे. मोदींचा फोटो वापरुन त्यांनी मतं मागितली. भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करु नये, आम्ही स्वतंत्र आहोत. मी अपक्ष आमदार आहे, नवनीत राणा अपक्ष खासदार आहे. त्यामुळे हिंदुत्वचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा उद्धव ठाकरे थांबवू शकणार नाही.
संजय राऊत हे पोपट आहेत. दररोज सकाळी पत्रकारांना जमवून बडबड करत असतात. गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार असल्याचे नवनीत राणाने म्हटले. शिवसैनिक आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यांनी मुंबईत पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आम्ही मुंबईत आलो आहोत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.