कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 12, 2021 | 09:17 IST

देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या आठवड्यामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

Red Alert for Konkan, Central Maharashtra for next five days
कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अ‍ॅलर्ट’
  • मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’
  • धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

मुंबई : देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या आठवड्यामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये आज सोमवारसाठी 'रेड अॅलर्ट' जाहीर करण्यात आला असून या काळात तुरळक ठिकाणी 20 सेंटीमीटरहून जास्त पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. 

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य भारतावर निर्माण झालेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र यामुळे कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वारे मराठवाड्यावरही सक्रिय आहेत. त्यामुळे मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये या आठवड्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. या भागामध्ये फारसा पाऊस नसेल, असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही सोमवार आणि मंगळवारी पावसाचे प्रमाण काहीसे नियंत्रणात असू शकेल. सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही फारसा पाऊस नसेल. औरंगाबादमध्ये गुरुवारी, जालन्यामध्ये बुधवार-गुरुवारी, तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. लातूरमध्येही सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एखाद-दुसऱ्या जिल्ह्यात गुरुवारपर्यंत मंगळवार-बुधवारी तुरळक ठिकाणी पावसाचा वेग थोडा वाढू शकेल. मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये इतर दिवशी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला होता, तर मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज होता. मुंबईत रविवारी दिवसभरात कुलाबा येथे 18 मिलीमीटर, सांताक्रूझ येथे 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर रत्नागिरी येथे 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी येथेही दिवसभरात फारसा पाऊस नव्हता. रत्नागिरी केंद्रावर 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी