झारखंडही गमावले, भाजपची घोडदौड अनेक राज्यात लंगडी पडली: शिवसेना

मुंबई
पूजा विचारे
Updated Dec 24, 2019 | 09:29 IST

झारखंडमधून भाजपची सत्ता गेलेली आहे. गेल्या २ वर्षांमध्ये भाजपनं गमावलेले हे सातवं राज्य आहे. महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपच्या हातातून गेलं आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

Saamna Artical
झारखंडही गमावले, भाजपची घोडदौड अनेक राज्यात लंगडी पडली: शिवसेना 

झारखंडमधून भाजपची सत्ता गेलेली आहे. गेल्या २ वर्षांमध्ये भाजपनं गमावलेले हे सातवं राज्य आहे. महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपच्या हातातून गेलं आहे. झारखंडची सत्ता आता काँग्रेस- झामुमो-राजदच्या आघाडीकडे गेली आहे. आघाडीनं ४७ जागांवर, तर सत्ताधारी भाजपनं २६ जागांवर विजय मिळवला. इतर ९ जागांपैकी झारखंड विकास मोर्चाला ३, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनला (एजेएसयू) २ आणि इतरांना ४ जागा मिळाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही हा पराभव स्वीकारला आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामनाच्या  अग्रलेखात झारखंडमध्ये भाजपचा झालेल्या पराभवावर निशाणा साधला आहे.  झारखंडही गमावले अशी हेडलाईन देत भाजपला अग्रलेखात फटकारले आहे. भाजपची घोडदौड अनेक राज्यात लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे, असं म्हणत सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे. 

लोकांनी ठरवले की ते सत्ता, दबाव आणि आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालेच. झारखंडही बेडरपणे बदलाला सामोरे गेले. असं म्हणत भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार, अशी टीका करण्यात आली आहे. 

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात 

  1. झारखंडमधूनही भारतीय जनता पक्षाचे राज्य गेले आहे. आधी महाराष्ट्र गेले, आता झारखंड गेले. महाराष्ट्र व झारखंड या राज्यांची तुलना करता येणार नाही. मात्र भाजपने आणखी एक राज्य गमावले व पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ राबवूनही झारखंड भाजपला राखता आले नाही. 
  2. काँग्रेस-राजदच्या पाठिंब्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार तेथे येत आहे. हे भाजपसाठी धक्कादायक आहे. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानची घोषणा भाजपचे नेते करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली. मध्य प्रदेश, राजस्थान ही मोठी राज्ये भाजपने आधीच गमावली.
  3. 018 साली भाजप साधारण 75 टक्के प्रदेशांत सत्ता ठेवून होती. आता घसरगुंडी झाली आहे व जेमतेम 30-35 टक्के प्रदेशांत भाजपची सत्ता दिसत आहे. भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे. 
  4. 2018 ला देशातील 22 राज्यांत भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यांतही भाजप घुसली. अगदी त्रिपुरा, मिझोरामपर्यंत त्यांचे झेंडे फडकले, पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे. 
  5. खासकरून नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा आणि आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. 
  6. लोकांनी एकदा ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालेच. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी